आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य यंत्रणेने कागदी घोडे नाचवू नये; प्रत्यक्ष प्रभागात जाऊन काम करावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील वाखारकर नगरात डेंग्यू आजाराने एका तरुणीचा मृत्यू झाला असून, या भागात अजून २२ डेंग्यूसदृश रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याची माहिती महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडे नाही, ही गंभीर बाब आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करता प्रत्यक्ष प्रभागात जाऊन आढावा घ्यावा, अशा कडक शब्दांत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सूचना केल्या. तसेच मनपाबरोबर जिल्हा रुग्णालय आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचीही तेवढीच जबाबदारी अाहे. त्यामुळे त्यांनीही संयुक्तपणे हे काम करावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.
शहरात डेंग्यूमुळे एका तरुणीचा मृत्यू झाला अाहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी रविवारी महापालिकेच्या सभागृहात तातडीने आढावा बैठक घेतली. या वेळी महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे, उपमहापौर उमेर शव्वाल, स्थायी समिती सभापती सोनल शिंदे, सभागृह नेते कमलेश देवरे, विरोधी पक्षनेते संजय जाधव, अनूप अग्रवाल, सतीश महाले, संदीप महाले, चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, उपायुक्त रवींद्र जाधव, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सुभाष विसपुते, मलेरिया विभागाच्या अपर्णा पाटील, डॉ. मृदृला द्रविड, डॉ. नीता हटकर, मनपा आरोग्याधिकारी डॉ. बी.बी. माळी, रत्नाकर माळी, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, सुनील महाले आदी उपस्थित होते.
या वेळी सुरुवातीला आयुक्त संगीता धायगुडे यांनी शहरातील स्वच्छतेच्या परिस्थितीचा आढावा सादर केला. त्यात त्यांनी डेंग्यू रुग्णांची परिस्थिती सांगितली. त्यात मनुष्यबळ कमी असल्याने ठेकेदारांकडून कर्मचारी घेतले आहेत. तर घरोघरी जाऊन पाण्याच्या भांड्यात डास अळींची तपासणी करण्यात येते. त्यात पुरुषांना घरात जाण्यास अडचणी येत असल्याने बचत गटाच्या महिलांकडून काम करून घेण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शहरातील डेंग्यूची परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणेेने सतर्क राहणे आवश्यक आहे. जेव्हा शहरात एक तरुणी डेंग्यूच्या अाजाराने दगावते, त्या वेळी त्याची जबाबदारी प्रशासनावर येते. केवळ स्वच्छता अभियान राबवून उपयोग होणार नाही. नेमका आरोग्य विभाग कुठे कमी पडतो हे समजायला हवे. ज्या भागात डेंग्यूने तरुणीचा मृत्यू झाला, त्याच भागात डेंग्यूसदृश २२ रुग्ण आहेत. त्याची माहिती आरोग्य यंत्रणेला नाही. आरोग्य विभागाने सांगितलेली माहिती कागदोपत्री आहे. कागदावर कामे करण्यापेक्षा प्रत्यक्ष तेथे जाऊन परिस्थितीची माहिती घ्यावी. कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा बाहेर पडा. शहरात स्वच्छतेची परिस्थिती ठीक नाही. गटारींची स्वच्छता नियमित कचरा उचलला जात नसल्याचे चित्र आहे. आजार होऊच नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. जनजागृती, लोकप्रबोधनातून अनेक आजारांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. प्रशासन जागृतीत कमी पडत असल्याचे दिसते, असे सांगितले. यावर खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी आरोग्य विभाग मनपा प्रशासनाला कडक शब्दांत सूचना केल्या आहे. त्याचप्रमाणे िहरे वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयाचीही शहराची जबाबदारी आहे. मनपा, हिरे वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या तिघांनी समन्वय साधून काम करावे, हलगर्जीपणा चालणार नाही, अशा सूचना या वेळी डाॅ.भामरे यांनी या वेळी दिल्या.

दीड वर्षापासून थम्ब मशीन बंद
सफाई कर्मचाऱ्यांची सकाळी हजेरी घेण्यासाठी अारोग्य विभागात थम्ब मशीन देण्यात आले आहे. मात्र हे मशीन गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यावर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आराेग्य यंत्रणेला चांगलेच धारेवर धरीत बेजबाबदार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली.

तापाच्या रुग्णांची काळजी घ्या
डेंग्यूच्या रुग्णांना सुरुवातीला ताप येतो. त्यामुळे तापाच्या कोणत्याही रुग्णांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणत्याही तापाच्या रुग्णाचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवावे. त्यातून रुग्णांवर उपचार लवकर सुरू होऊन अाजार आटोक्यात येऊ शकतो. अशा प्रकारे डेंग्यूविरोधी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेनेही तत्काळ सेवा द्यावी, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.

योजना आणताना मान खाली घालायला लावू नका
केंद्रातून निधी कमी पडू देणार नाही. निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. मात्र, योजना आणल्यावर ती व्यवस्थित राबवावी. पाणी योजनेमुळे नाव खराब झाले आहे. त्यामुळे केंद्रात काम करताना मान खाली घालण्याची वेळ आणू नये, असे खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी या वेळी स्पष्ट केले.

नगरसेवकांनी मांडल्या सूचना
या बैठकीत नगरसेवक प्रतिभा चौधरी, सतीश महाले, हिरामण गवळी अनूप अग्रवाल यांनी सूचना मांडल्या. सतीश महाले यांनी शहरातील स्लम भागात मनपा, हिरे महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या समन्वयातून रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करावे असे सांगितले. तर प्रतिभा चौधरी यांनी नियमित स्वच्छता होत नाही. सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे याकडे लक्ष वेधले आहे. वाखारकरनगर भागातील नाल्याची पूर्णपणे स्वच्छता करावी सफाई कर्मचाऱ्यांची नियमित हजेरी घ्यावी, अशा सूचना हिरामण गवळी यांनी मांडली.
बातम्या आणखी आहेत...