आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न आरोग्याचा: भुसावळ नगराध्यक्षांच्या आदेशाला ठेंगा; साफसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- साथरोग, डेंग्यू नियंत्रणासाठी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी आरोग्य व मलेरिया विभागातील कर्मचारी, अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यात तत्काळ साफसफाई, फवारणीचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कृतिशील प्रयत्न होत नसल्याने ही बैठक म्हणजे वार्‍यावरची वरात ठरू पाहत आहे.

शहरातील खासगी रुग्णालयांत डेंग्यूचे आठ रुग्ण उपचार घेत असल्याने नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी तत्काळ दखल घेतली. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात आरोग्य विभाग आणि मलेरिया कर्मचार्‍यांची तातडीची बैठक त्यांनी घेतली होती. पालिका आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व भागांत कंटेनर सर्वेक्षण करून स्वच्छता मोहीम राबवणे, कोरडा दिवस पाळणे, शहरातील सर्वच भागांत फवारणी आणि धुरळणी करणे, डासांचे उच्चाटन करण्यासाठी तुंबलेल्या पाण्याचा निचरा करणे आदींबाबत चर्चा झाली होती. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी कर्मचार्‍यांना सक्तीच्या सूचना देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले होते. मात्र, यावर अजूनही उपाययोजना झाली नाही.

उत्सवात स्वच्छता गरजेची
दहा दिवस चालणार्‍या गणेशोत्सवात शहरात कमालीचा उत्साह असतो. गणेश दर्शनासाठी महिला-पुरूष मोठय़ा संख्येने घराबाहेर पडतात. बाजारात ग्राहकांची गर्दी वाढते. या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता गरजेची आहे. अन्यथा साथरोग कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती जास्त आहे. शहर स्वच्छता आणि नागरिकांमध्ये व्यापक प्रबोधन हाच यावरील एकमेव मार्ग आहे.

उद्यापासून कामाला लागू
पालिकेला सलग तीन दिवस सुट्या होत्या. कामाचे नियोजन चुकले. गणेश चतुर्थीनंतर शहरातील स्वच्छतेचे व्यापक काम हाती घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना याबाबत सूचना केल्या आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याबाबत आम्ही गंभीर आहोत.
-शारदा झोपे, सभापती, आरोग्य विभाग

प्रसिद्धीचा बडेजावपणा
पालकमंत्री संजय सावकारे शहरात डेंग्यूच्या उपाययोजनांबाबत जनजागृती पत्रकाचे प्रकाशन करून बडेजावपणा मिरवतात. मात्र, सत्ताधारी पालिकेला स्वच्छतेसाठी आदेश देत नाहीत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी पालिकेला नाही, असे चित्र सध्या तरी आहे.
-अँड. कैलास लोखंडे, माजी जिल्हा सरचिटणीस, मनसे

पाण्याचा निचराच नाही
शहरात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या मुळे शहरातील गटारी आणि खड्डय़ांमध्ये पुन्हा पाणी तुंबले. आता डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढण्याचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. शहरातील लोखंडी पुलाखाली रात्रभर पाणी साचून होते. शहरातील सर्वच रस्त्यांवरील मुरूमही वाहिल्याने पाण्याचा निचरा होणे कठीण बनले आहे.

अफलातून जावईशोध
शहरातील केवळ झोपडपट्टी भागांत महिला आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांच्या टीमने कंटेनर सर्वेक्षण केले. या व्यतिरिक्त शहरात विविध अपार्टमेंट आणि इतर भागाला सोईस्कर बगल देण्यात आली. कॉलन्यांमध्ये सर्वेक्षणासाठी नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचा जावई शोधही या वेळी लावण्यात आला. प्रत्यक्षात खरोखर सर्वेक्षण होते किंवा नाही? याची खातरजमा होणे गरजेचे आहे.