आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News In Marathi,Pathalogy, Bogus Doctor, Divya Marathi

डीएमएलटी ही पदविका घेऊन पॅथॉलॉजी चालविणारे ठरतील 'बोगस'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डीएमएलटी ही पदविका घेऊन पॅथॉलॉजी चालविणार्‍यांना ‘बोगस डॉक्टर’ ठरवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी भूमिका पॅथॉलॉजिस्टच्या राज्य संघटनेनेच घेतली आहे. त्यामुळे तशी कारवाई झाली तर संबंधित लॅब चालकांना तीन वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास होऊ शकतो.


वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदविका धारण करणार्‍यांना नियमाप्रमाणे तपासणी अहवाल देता येत नाही. मात्र, सध्या मोठय़ा प्रमाणात हेच तंत्रज्ञ या प्रयोगशाळा चालवित आहेत.जळगावात या लॅबची सर्वाधिक संख्या आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँण्ड मायक्रोबायलॉजिस्ट संघटनेने घेतलेली भूमिका परिणामकारक आहे. अशा लॅबला कायदेशीर करण्याचे राज्यकर्त्यांचे प्रयत्न चुकीचे ठरवित संघटनेने त्या प्रयत्नांचा निषेध केला आहे.


सद्याची स्थिती
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार राज्यात अनेक डीएमएलटी किंवा तत्सम अर्हताधारक व्यक्ती स्वत: रक्त, लघवी आदी नमुन्यांवर चाचण्या करतात. स्वत: चाचणी अहवाल तयार करतात व स्वत:च किंवा एमडी पॅथॉलॉजिस्टच्या नावाचा शिक्का वापरून रुग्णांना वितरित करतात, जे बेकायदेशीरच नव्हे तर धोकादायकही आहे.


तीन वर्षांचा कारावास
महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 चा कलम 33 (2) अन्वये बोगस डॉक्टर ठरलेल्या व्यक्तीला एक ते तीन वर्षांचा सर्शम कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यत दंड होऊ शकतो.


काय आहे फरक
पॅथॉलॉजिस्ट : एम.बी.बी.एस.डिग्रीनंतर पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी (एम.डी.) किंवा पदविका (डीसीपी) धारण करून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत असलेले तज्ज्ञ.
टेक्निशियन : वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदविका (डीएमएलटी)हा अभ्यासक्रम दहावी, बारावी किंवा बी.एसस्सी नंतर 1 वर्षाचा आहे. पॅथॉलॉजिस्टला प्रयोगशाळेत मदत करण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे.


एमएमसी काय म्हणते
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील पत्रानुसार पॅथॉलॉजी लॅबोरेटरी व क्लिनिकल किंवा मेडिकल लॅबोरेटरी या वेगवेगळ्या नसून एकच आहेत. टेक्निकल अँनालिसीस रिझल्टशिट रुग्णांना किंवा डॉक्टरांना वितरित करणे हा पॅथॉलॉजी या शाखेचा वैद्यकीय व्यवसाय असून तो करण्याची शैक्षणिक अर्हता एमडी पॅथॉलॉजी, एमबीबीएस डीसीपी, एमबीबीएस डीपीबी या आहेत. नोंदणीकृत नसताना वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या व्यक्तींविरुद्ध कलम 33 (2) अन्वये कारवाई करण्याचे आदेश देता येतील.


निवेदन देणार
राज्य संघटनेच्या भूमिकेनुसार जिल्हा संघटनाही बोगस डॉक्टरांच्या शोध घेणार्‍या समितीचे अध्यक्ष अर्थात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व मनपा वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देणार आहोत. बैठकीत भूमिका ठरवली जाणार आहे. डॉ.भरत बोरोले, सचिव, जिल्हा पॅथॉलॉजीस्ट संघटना.