आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बलबलकाशी’चे पाणी काठावरील वस्तीत शिरले; जनजीवन विस्कळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात अनंत चतुर्दशीनंतर एका दिवसाच्या विर्शांतीनंतर शुक्रवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. डी. एल. हिंदी विद्यालयाच्या पाठीमागील गोपाळनगर, राहुलनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

गडकरीनगर, प्रल्हादनगर, जाममोहल्ला, गरूडप्लॉट, काझीप्लॉट, पंचशीलनगर, जामनेर रोडवरील बंब कॉलनी, हॉटेल रंगोली, मान रेसिडेन्सी, लोखंडी पूल, शारदानगर, शांतीनगर, तापीनगर भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. दुपारी 12 वाजेनंतर पावसाची रिपरिप थांबल्याने निर्मनुष्य झालेल्या रस्त्यांवरील वर्दळ वाढली. आठवडे बाजारावरही पावसाचा परिणाम झाला. सतारे पुलाखाली पाणी साचल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना रविवारी दुपारपर्यंत लोखंडी पूलाखालील मार्गाचा वापर करावा लागला. प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह शासकीय विर्शामगृह आवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तळे साचले आहे.
हतनूरचे 36 दरवाजे उघडले

तापी-पूर्णा नदीच्या उगमस्थानासह हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. धरणाचे 36 दरवाजे दुपारी 1 वाजता उघडण्यात आले. त्यात 24 दरवाजे पूर्ण तर 12 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले. तापीनदीला पूर आला आहे.

धरणातून 6 हजार क्युमेक्स प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. सध्या धरणाची जलपातळी 211.40 मीटरवर स्थिर आहे. जलसाठा 254.60 दलघमी आहे. सुटीमुळे रविवारी धरणावर निसर्गप्रेमींची गर्दी होती. भुसावळ नजीकच्या तापी पुलावरही संध्याकाळी गर्दी झाली होती.

शहरात असा झाला पाऊस
शहरात शनिवारी 9.4 तर रविवारी 88.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांत तब्बल 97.6 मिलीमीटर पाऊस झाला. यापूर्वी जून महिन्यात दोन दिवसांत 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भोळे कॉलनीत शिरले पाणी
भोळे कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. रिपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी ही माहिती महसूल प्रशासनाला दिली. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे झाले. राजू सूर्यवंशी, राजेंद्र आवटे या वेळी उपस्थित होते.

सूर्यदर्शनाची प्रतीक्षा
गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे सूर्यदर्शनच झालेले नाही. रस्त्यांसह मोकळ्या जागेवर पाणी साचल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.