आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावितांचा विक्रम रोखण्यास गावितच मैदानात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - नंदुरबार लोकसभा निवडणुकीत सलग 9 वेळा निवडून येत पी. एम. सईद यांच्या विक्रमाशी बरोबरी करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री माणिकराव गावित हे आता दहाव्यांदा संसदेत जाण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. मात्र पूर्वार्शमीचे राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हिना यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे माणिकरावांचा नवा विक्रम रोखण्यात हिना यशस्वी होतील काय, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

गांधी घराण्याचे नंदुरबार मतदारसंघावर विशेष प्रेम आहे. सोनिया गांधी यांच्या राजकीय करिअरची सुरुवात नंदुरबार येथील जाहीर सभेनेच झाली होती. यूपीएची महत्त्वाकांक्षी योजना आधार कार्डचा शुभारंभही याच जिल्ह्यातून करण्यात आला होता. परंतु डॉ. विजयकुमार गावित यांनी गांधी घराण्याचा हा करिष्मा आपल्या विकासकामांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात कमी केला. आदिवासी विकास मंत्री असताना डॉ. विजयकुमार यांनी आदिवासी भागात कोट्यवधींच्या योजना राबवल्या. यातूनच त्यांची जिल्ह्यातील मतदारांवर पकड निर्माण झाली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांनी समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी दाखल करून माणिकराव गावितांना आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत माणिकराव अवघ्या 40 हजार मतांच्या फरकाने विजयी ठरले होते. यंदा मात्र विजयकुमारांनी आपली कन्या डॉ. हिना यांनाच भाजपतर्फे रिंगणात उतरवून माणिकराव व राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘जोरका धक्का’ दिला. मात्र त्यांनी भाजपची उमेदवारी घेतल्याने मुस्लिम, ख्रिश्चन समाजाचे त्यांच्यापासून कॉँग्रेसकडे दुरावण्याची शक्यता आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा, शहादा,नवापूर,नंदुरबार तसेच शिरपूर व साक्री या सहा विधानसभांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींची हवा असल्याने कॉँग्रेसचा गड राखण्यासाठी पालकमंत्री अँड. पद्माकर वळवी, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, आमदार के.सी.पाडवी या नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. जिल्हा परिषद, चार नगरपालिका, 6 पैकी 4 पंचायत समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे गड कायम राखण्याची कॉँग्रेसला आशा आहे.

राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक : शहाद्यातील ज्येष्ठ नेते पी.के.अण्णा पाटील यांचे सुपुत्र दीपक पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ते आघाडी धर्म पाळतात की डॉ. हिना यांच्या पाठीशी उभे राहतात, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दीपक पाटील यांच्या मागे गुर्जर समाजाची ताकद आहे. अनेक सहकारी संस्थाही त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेना,भाजप, रिपाइं महायुतीसोबतच राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा डॉ. हिना यांना मिळण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर मोदींचा उदो उदो होत असला तरी दुर्गम भागातील आदिवासींपर्यंत हे प्रभावी प्रचारतंत्र पोहोचलेलेले नाही. त्यामुळे या भागात मोदींची तेवढी हवा जाणवत नाही. तरीही नेतृत्वबदलाच्या मात्र काही भागातील मतदारांच्या अपेक्षा आहेत. माणिकराव विजयी झाले तर सलग दहाव्यांदा संसदेत जाण्याचा नवा विक्रम ते नोंदवतील आणि पराभूत झालेच तर डॉ. हिना यांच्या रुपाने एक उच्चशिक्षित महिला आदिवासी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिल्लीत करतील. त्यामुळे दोन्ही अर्थाने इतिहास लिहिला जाणार आहे. डॉ. विजयकुमार यांनी राजकारणातले सर्वस्व पणाला लावल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. डॉ. हिना यांनी राजकारणात अचानक केलेली एन्ट्री, त्यानंतर त्यांच्या उमेदवारीला घेण्यात आलेली हरकत, त्यानंतरही उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने कार्यकर्त्यांत दिसणारा जोश, या घडामोडींमुळे नंदुरबार मतदारसंघ राज्यात चर्चिला गेला. एकूण नऊ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढाई गावितांमध्येच होणार हे तितकेच खरे.

माणिकराव गावित
बलस्थाने : राजकारणात 50 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क, भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, साधा,भोळा स्वभाव.
उणिवा: अल्पशिक्षित असल्याचा ठपका, इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्याने अडचण, निष्क्रिय खासदार म्हणून ठपका, निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता नाही.

डॉ. हिना गावित..
बलस्थाने : उच्च् शिक्षित, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात दोन वर्षांपासून काम, वडिलांच्या विकासकामांचा फायदा, राष्ट्रवादीची छुपी मदत.
उणिवा: जातीयवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे अल्पसंख्याक वर्ग दूर, प्रभावी वक्तृत्वाचा अभाव, अन्य पक्षातून आयात केलेला उमेदवार असल्याचा ठपका.