आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ वर्ष, २०० गरीब मुलांना शिक्षण, स्वावलंबनाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गरिबीमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये. आई-वडिलांनी शाळेची पायरीही चढली नसेल, तरी मुलांनी शिकून मोठे व्हावे, त्यांनी चांगली नोकरी करावी, या जिद्दीला पेटून उठलेल्या सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी १४ वर्षांत सुमारे २०० गरीब मुलांचे ‘शैक्षणिक पालकत्व’ स्वीकारले अाहे. यातील दोन मुले अाज पोलिस झालेत, तर एक मुलगा नाशिक येथे नामांकित कंपनीत नोकरीस आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे गरिबांच्या मुलांना माेठा अाधार मिळाला अाहे.
सन २००२ मध्ये हेमंत बेलसरे यांनी एका घटनेतून प्रभावित होऊन गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची जिद्द मनाशी बाळगली. सन २००२ मध्ये जळगावातील प्रभात चौकात एका कचाराकुंडीत टाकलेले अन्न उचलून काही मुले खात हाेती. त्या मुलांच्या शेजारी कुत्रे डुकरेही अन्न खात होते. अत्यंत विदारक असे हे चित्र पाहून बेलसरे यांचे मन हेलावले. त्यामुळे अापण या मुलांसाठी काही तरी केले पाहिजे, या विचाराने त्यांच्या मनात काहुर माजले. त्यामुळे त्यांनी गरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला. आकाशवाणी चौकाच्या पुढे महामार्गाच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये या मुलांचे वास्तव्य होते. त्याच दिवशी सायंकाळी बेलसरे यांनी या मुलांचे घर गाठले. त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. दिनकर बाविस्कर, शंकर सुशीर, जितेंद्र ठाकूर, सुनील ठाकूर या मित्रांसह पत्नी सुनीता यांच्या मदतीने बेलसरेंनी या मुलांच्या झोपडपट्टीमध्येच ‘नवकिरण’ नावाच्या शाळेचा आरंभ केला. सुरुवातीला त्यांच्या शाळेत १६ मुलांना शिक्षण देणे सुरू केले. ही शाळा पाहून तत्कालीन आकाशवाणीच्या निवेदिका उषा शर्मा यांनी या शाळेला ‘बिनभिंतीची शाळा’ ही उपमा देऊन, त्यावर आधारित एक कार्यक्रम आकाशवाणीवर प्रसारित केला होता. १६ मुलांना बेलसरे यांनी महिनाभरानंतर नगरपालिकेच्या ४५ क्रमांकाच्या शाळेत दाखल केले. शाळेत प्रवेशित करण्यासाठी या मुलांचे जन्म दाखले नव्हते. त्यामुळे सुधर्मा संस्थेनेच प्रतिज्ञापत्र तयार करून दिले. त्यानंतर बेलसरे यांनी शहरातील हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा शोध सुरू केला. त्यानंतर २५ अल्पवयीन मुलांची यादी तयार झाली. तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण साळंुखे यांच्या मदतीने मुख्यालयाच्या परिसरातच एक खोली मिळाली. त्यात मुलांचे वर्ग भरवले गेले. सोनाली कुळकर्णी-रेंभोटकर या त्यांच्या शिक्षिका झाल्या. डॉ.अशोक शहा हे या सर्व मुलांना मोफत वैद्यकीय उपचार देत आहेत. तसेच इतर ते १० दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करीत आहेत. बेलसरे यांना या कार्याबदल ‘गॉड फ्रे’ हा पुरस्कारही मिळाला आहे.

राकेश पाटील : चाळीसगावयेथील राकेशने दहावीत ८६ टक्के गुण मिळवले होते. मात्र, घरी सावत्र आई असल्यामुळे पुढे शिक्षणासाठी अडचणी आल्या. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी तो एका चहाच्या टपरीवर कामाला होता. याच टपरीवरून बेलसरे यांनी राकेशची माहिती घेत त्याला पुढील शिक्षणासाठी मदत केली. आज राकेश हा नाशिक येथील कंपनीत नोकरीला आहे.

समाधान धनराज पाटील : हेदोघे कुसुंबा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे आठवीपासून शिक्षण सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर आली. सात वर्षांपूर्वी हे दोघे बेलसरे यांंच्या संपर्कात आले. त्यांनी दोघांचा शैक्षणिक खर्च उचलला. सहा महिन्यांपूर्वीच धनराज हा सीआरपीएफ तर समाधान हा पोलिस भरतीमध्ये निवडला गेला.