जळगाव- जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर प्रभाव टाकणा-या विविध आर्थिक गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेला वेग मिळणे शक्य आहे. पोलिसात घरकुलशिवाय विमानतळ, अॅटलांटा, जिल्हा बँकेतील संगणक खरेदी घोटाळा या आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना निष्णांत लेखापरीक्षकांची गरज होती. त्यादृष्टीने पोलिस यंत्रणेने सीए असोसिएशनला पत्र दिले होते. पोलिसांना सीएंची यादी प्राप्त झाली असून वरिष्ठांच्या परवानगीनंतर लेखापरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. घरकुल घोटाळ्यापाठोपाठ महापालिकेतील विमानतळ, वाघूर, अॅटलांटा, जिल्हा बॅँकेतील आयबीपी अकाउंट, अलीकडच्या काळातील संगणकीकरणाच्या घोटाळ्यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आणि अपहाराच्या रकमेचा हिशेब करण्यासाठी आता लेखापरीक्षकांची मदत घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सीए शाखेला ई-मेलने पत्र पाठवत लेखापरीक्षकांची मागणी केली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा जळगावातील ‘हाय प्रोफाइल’ गुन्ह्यांच्या तपासाच्या फायली उघडल्या जाणार आहेत. सध्या घरकुल अपहाराच्या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. याशिवाय विमानतळ, अॅटलांटा, संगणक घोटाळ्याच्या फिर्यादी पोलिसांत दाखल आहेत. पोलिसांना या गुन्ह्यांचे तपास करून दोषारोप निश्चित करण्याचा मार्ग मोकळा करायचा आहे.
विमानतळ विकास योजना : 11 कोटी रूपयांच्या विकास योजनेत 2 कोटी 64 लाख रुपये खर्चाचे काम मंजूर झाल्यानंतर पुढील कामकाज बंद पडले. त्यानंतर अपहार झाल्याचा आरोप करीत नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
अॅटलांटा योजना : 2 जानेवारी 1996 ला तत्कालीन पालिकेने 133 रस्त्यांचे पेव्हर मशीनने डांबरीकरणाचा ठराव केला होता. कामाचे स्वरूप व मुदत वाढवून 446 कामांचे कार्यादेश काढून 59 कोटी 11 लाखांवर कामाची रक्कम गेली होती. यासंदर्भातही गुन्हा दाखल आहे.
फुकट बससेवा : झोपडपट्टी धारकांना हुडकोत घरे दिल्यानंतर त्या लोकांसाठी मोफत बससेवा सुरू केली होती. अनधिकृतपणे ही सुविधा पुरवल्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले.