आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमिक शिक्षणाधिकारी तपासणार नववीचे पेपर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नववीतून दहावीत येणार्‍या विद्यार्थ्यांची वाढती गळती लक्षात घेता नववीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्याचे काम माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक करणार आहे. त्यामुळे नववीला बोगस पटसंख्या दाखवणार्‍या शाळांचा भंडाफोड होणार आहे.
बोगस पटसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनस्तरावरून मोफत सक्तीच्या कायद्यान्वये भरारी पथकांच्या माध्यमातून लगाम घालण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून नववीत शिकणारी मुलांची संख्या जास्त असते. मात्र, दहावीला प्रवेश घेऊन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या मोठी घट झाल्याची बाब माध्यमिक शिक्षण संचालकांच्या निदर्शनास आली आहे. त्यानुसार नुकत्याच पुणे येथे झालेल्या बैठकीत संचालकांनी नववीतील विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्याचे काम शिक्षणाधिकारी यांच्या पथकाकडे दिले आहे. यातून विद्यार्थ्यांची गळती होण्याचे नेमके कारण काय ही वस्तुस्थिती समोर येणार आहे. मुले नापास होतात की बोगस पटसंख्या दाखविली हे पडताळले जाणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यंदा नववीच्या विद्यार्थ्यांचे पेपर शिक्षण विस्तार अधिकारी तपासणार आहेत. यात खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. तुकडी वाढविण्यासाठी बोगस पटसंख्या दाखविली जात असल्याचा प्रकार निदर्शनात आला आहे.
विनाअनुदानित शाळांमध्ये नववीमध्ये अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापास केले जाते. अन्यथा, शाळेचा निकाल 100 टक्के लागण्यासाठी ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसर्‍या शाळेत प्रवेश घेण्यास संस्थाचालक भाग पडतात. ह्या प्रकारावर आळा घालण्याची जबाबदारीही माध्यमिक शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.