आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात सामान्यांना फसवण्याचा ‘हायटेक’ फंडा; बक्षिसांचे आमिष दाखवून लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तुम्हाला आमच्या कंपनीकडून बक्षीस लागले आहे. आम्ही सांगत असलेल्या अटी पूर्ण करून आपली बक्षिसाची रक्कम घेऊन जा किंवा मी मोठा पोलिस अधिकारी बोलतोय, तुमची चौकशी करायची आहे. चौकशी टाळण्यासाठी बँकेत पैसे भरा, अशा आशयाच्या ऑफर्स वजा धमक्या देऊन गेल्या महिनाभरात तिघांकडून भामट्यांनी दहा लाखांपेक्षा जास्त रकमेची लूट करण्यात आली असून याप्रकरणी रविवारी स्थानिक गुन्हे शाखेकडे पीडित तरुणाने तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही सुमारे 15 पेक्षा जास्त लोकांनी पोलिसांकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. तर अनेक जण आपली बदनामी होईल, या उद्देशाने तक्रारी दाखल करीत नसल्यामुळे भामट्यांना फावले आहे. हे भामटे ‘हायटेक’ पद्धतीने लुबाडणूक करीत असल्याने त्यांना अटक करणे आव्हानच आहे.

आमिषाला बळी पडू नये
मोबाइल कॉलवरून आमिष देत लूट करण्याच्या 15 ते 20 तक्रारी आल्या आहेत. अपेक्षा किंवा लोभापोटी नागरिकांनी अशा कॉल किंवा मॅसेजेसला प्रतिसाद देऊ नये. कोणाच्या धमकीला बळी न पडता कोणत्या अनोळखी इसमाच्या बँक खात्यात पैसे भरू नये.
-डी.डी.गवारे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

केस 1 : 28 जुलैला एका रिअल इस्टेट व्यावसायिक तरुणाने (रविवारचा तक्रारदार) +9230077724560 क्रमांकावरून फोन आला होता. यावेळी त्याला तुम्हाला टाटा डोकोमो कंपनीकडून तुम्हाला 40 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. आता तुम्ही तुमचा मोबइल बंद करा आणि सकाळी 9 वाजता आम्हास फोन करा असे सांगण्यात आले होते. त्यानुसार तरुणाने त्यांना फोन केला असता भामट्यांनी बक्षीस मिळविण्यासाठी आमच्या बँक अकाउंटमध्ये 10 हजार रुपये भरा असे सांगिंतले. त्यानुसार बँकेत 10 हजार रुपये भरताच पुढील चार दिवस पुन्हा याच भामट्याने स्टेट बँकेच्या वेगवेगळ्या 20-25 अकाउंटवर 9 लाख 56 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आल्यानंतर तो तणावग्रस्त झाला. त्यामुळे त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार केली. अर्जासोबत त्याने संबंधितांचे मोबाइल क्रमांक, बँक अकाउंट नंबर दिले आहेत.

केस 2 : 20 दिवसांपूर्वी भास्कर मार्केट परिसरातील नामांकित स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरला असाच फसवणुकीचा फोन आला होता. मी मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलतोय, आमच्याकडे तुमच्या विरोधात गर्भलिंग तपासणी, स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भातील खूप तक्रारी आल्या आहेत. तुमची चौकशी करायची आहे. तुम्ही मुंबईला या. जर चौकशी थांबवायची असेल तर आम्हाला पैसे द्या. जर पैसे नाही दिले तर आम्ही तुम्हाला असाच त्रास देऊ असे सांगितले. घाबरलेल्या डॉक्टरांनी भामट्यांच्या अकाउंटवर 50 हजार रुपये टाकले. तरीदेखील पुन्हा डॉक्टरांना पैशाची मागणी करण्यात आली. त्यामुळे शेवटी डॉक्टरांनी स्थानिक गुन्हे शाखेत याविषयी तक्रार दाखल केली आहे.

केस 3 : सुमारे महिनाभरापूर्वी शहरातील एका महिलेच्या मोबाइलवर कॉल आला. तुम्हाला चाळीस लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे. तुम्ही आमच्या सूचनेनुसार फॉम्र्यालिटी पूर्ण करा. त्यानुसार यावेळी भामट्यांनी त्या महिलेकडून चार वेळेस करून 1 लाख 60 हजार रुपये बँकेत जमा करण्यास भाग पाडले. या महिलेनेही स्थानिक गुन्हे शाखेत तक्रार केली आहे.

सात लाखांत लुटले
गेल्या वर्षी विदेशी चलनाचे आमिष दाखवून जयंत कविश्वर साउथ आफ्रिकेतील ठगांनी 6 लाख 91 हजारात लुटले होते. याप्रकरणी पीटर मार्टिन नामक विदेशी भामट्याला पोलिसांनी अटकही केली होती. सध्या तो जामीन घेऊन आपल्या देशी परतला आहे.