आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावरील खड्डे ३१ पूर्वीच बुजवणार, गुप्ता, पाटील यांचे आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; राष्ट्रीयमहामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असून येत्या ३१ बरपर्यंत महामार्गावर एकही खड्डा शिल्लक राहणार नाही. तसेच शहरातील खड्डे बुजवण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी आंदोलकांना दिली. या वेळी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील खड्डे बुजवण्यासंदर्भात दीपक गुप्ता, शिवराम पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. या वेळी त्यांनी खड्डे बुजवण्याचा प्रश्न लावून धरला. यात त्यांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या सहा महिन्यांत अपघातांमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या खड्ड्यांसाठी अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कालिंकामाता मंदिर ते जुने जळगाव हा रस्ता दुरुस्त करावा, शिवाजीनगर- कानळदा रस्ता, दूध फेडरेशन- जुना हायवे रस्ता, प्रेमनगर- बजरंग बोगदा, जुने बसस्थानक ते नेरी नाक्यापर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात पोलिस अधीक्षकांनादेखील निवेदन दिले.
त्यानंतर संध्याकाळी अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले होते. या वेळी मनपाचे शहर सहायक अभियंता सुनील भोळे यांनी शहरातील रस्त्यांची कामे सुरू केल्याची माहिती आंदोलकांना दिली. चर्चेवेळी दीपक गुप्ता, शिवराम पाटील, अनिल नाटेकर, अर्जुन भोई, अमोल कोल्हे, मुकुंद गोसावी, बबलू पिपरिया, राजेश गुप्ता, कपिल ठाकूर, दीपक जोशी, रुपेश अग्रवाल, सुशील जैन, डॉ.सरोज पाटील उपस्थित होते.

काम होईपर्यंत गांधीगिरी
शहर आणि महामार्गावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे दररोज एक गुलाबाचे पुष्प पाठवले जाणार आहे.