जळगाव- 12 व्याशतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव पातळीवर जैवविविधता समित्या स्थापन करून त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र, यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाव परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे.
विविध वनस्पती, जलचर प्राणी, मासे, देशी- परदेशी पक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी यांचे अस्तित्व असलेल्या मेहरूण परिसरात माेठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळून येते. लांडोरखोरी
राखीव वनक्षेत्र लागून असल्याने वन्यप्राण्यांचेदेखील या भागात वास्तव्य असते. मात्र, मानवी अतिक्रमण, प्रदूषण, सांडपाणी, रहिवासासाठी उभारलेले सिमेंटचे जंगल यामुळे ऐतिहासिक तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. शहरातील दोनशेवर विहिरींना जीवदान देणाऱ्या मेहरूण तलावातील नितळ पाणी इतिहासजमा झालेले आहे. जळगावच्या वैभवात भर घालणाऱ्या या तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जात अाहे. गटाराच्या पाण्यामुळे अनेक वनस्पती नष्ट होत असून, ५० टक्के पक्ष्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली आहे. नैसर्गिक जलस्रोतही बदलल्याने या तलावाची वाटचाल गटाराच्या दिशेने सुरू झाली आहे.