आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • History Expert Ninad Bedekar,Latest News In Divya Marathi

रणभूमी अनुकूल करण्याचे बाजीरावांमध्ये होते सार्मथ्य- इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रणभूमी अनुकूल झाल्याशिवाय बाजीराव पेशवे रणभूमीवरच येत नव्हते, म्हणूनच ते एकही युद्ध हरले नाहीत. अजय सेनापती, इतिहास-भूगोल तोंडपाठ, उत्तम अश्वांची पारख, उत्तम नियोजन अशी बाजीरावांची ओळख होती; यावर ते रणभूमी अनुकूल कशी होईल, अशी रणनीती आखायचे. म्हणूनच त्यांची 40 वर्षांची कारकीर्द विलक्षण ठरली, असे मत इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांनी व्यक्त केले. व.वा. वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांना रविवारपासून सुरुवात झाली. निनाद बेडेकर यांचे ‘पहिला बाजीराव’ या विषयावर व्याख्यान झाले.
बाजीराव पेशव्यांची संपूर्ण कारकीर्द झंझावाताची होती. त्यातल्या त्यात पालखेडची लढाई सर्वांनाच अचंबित करणारी ठरली. औरंगाबादजवळील गंगापूर गावाजवळील 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालखेड येथे बाजीरावांनी निजामाचा पराभव केला. एकीकडे निजामाने पुणे ताब्यात घेण्याच्या उद्देशाने कूच केली होती. तेव्हा बाजीराव हे निजामाचा प्रांत लुटत होते. निजामाची राजधानी असलेले औरंगाबाद लुटण्याची अफवा बाजीराव यांनी उठवली. हे ऐकून निजाम आपला तख्त वाचवण्यासाठी परत फिरला. त्या वेळी बाजीराव हे पालखेडजवळ होते. त्यांच्याकडे तेव्हा 8 ते 10 हजार घोडेस्वार होते.
त्या तुलनेत निजामाकडे 20 हजार घोडेस्वार होते; अशा परिस्थितीत निजाम हा तोफखाना दळनगर येथे ठेवून घोडेस्वारांसोबत बाजीरावांवर चाल करून आला. निजामाने गोदावरी ओलांडताच त्याच्या मागावर होळकरांचे 20 हजार घोडेस्वार अचानक आले. त्यामुळे निजाम पुढे सरकत होता. तो बाजीरावांसमोर येऊन ठाकला तेव्हा बाजीरावांनी स्वत:कडे 42 हजार घोडेस्वार उभे केले. चहूबाजूने निजाम फसला आणि शेवटी त्याला शरण यावे लागले. या लढाईचे वर्णन बेडेकर यांनी हुबेहुबपणे मांडले. या वेळी विनोद अग्रवाल, नितीन कुळकर्णी, अँड. प्रताप निकम, अँड. सुशील अत्रे, चारुदत्त गोखले, डॉ. उल्हास कडूस्कर आदी उपस्थित होते.
बाजीराव होते उत्तम सेनापती
दिल्लीच्या राजकारणाचा अभ्यास बाजीरावांनी वयाच्या 18 व्या वर्षीच केला होता. कुठलीही लढाई लढण्यापूर्वी तेथील रणभूमी अनुकूल असल्याशिवाय ते रणांगणातच उतरले नाही. पेशवाई करताना ते उत्तम सेनापती होते. त्यांच्या नावाचा डंका देशभर होता. त्यामुळे कुठेही लढाई झाली तर सूत्रधार बाजीरावच असतील, असे बोलले जायचे.
फक्त घोड्यांचा केला वापर
बाजीराव पेशवे यांनी कधीही घोड्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनांचा वापर युद्धासाठी केला नाही. कारकिर्दीत एक लाख किलोमीटरपेक्षा अधिक घोडदौड त्यांनी केली. त्यामुळे ते मुघलांना कधीच सापडू शकले नाही. नुसत्या त्यांच्या नावाने शत्रूंमध्ये थरकाप व्हायचा. बाजीराव यांच्या पराक्रमाचे अनेक दाखले बेडेकर यांनी या वेळी दिले.