आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • History Wirtier Wear The Glass Sammelan Chairman Nagnath Kottapalle

इतिहास लिहिणा-यांना चष्मे घालावे लागतील -संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - इतिहास लिहिणारे लोक लघुदृष्टीचे असल्याने खरा इतिहास मांडला जातच नाही. त्यांना व्यापक दृष्टी कधी येईल? त्यासाठी आपल्यालाच त्यांना चष्मे घालण्याचे काम करावे लागणार आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. मोहंमद आझम, स्वागताध्यक्ष गफ्फार मलिक, संमेलनप्रमुख डॉ. शेख इक्बाल मिन्ने, जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, विलास सोनवणे, अब्दुल मजीद जकेरिया, प्रा. फ. म. शहाजिंदे, कवी ए.के. शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोत्तापल्ले म्हणाले, की ‘इतिहास लिहिणारे कोण, त्यावरून इतिहास ठरतो. ज्यांना मनात मुस्लिमांबद्दल आस्थाच नाही ते त्यांच्याबद्दल कशाला लिहितील? ही मराठी वाङ्मयाची समस्या आहे. दृष्टी कमजोर झाली तर आपण डोळे तपासून घेतो. तसेच इतिहास लिहिणा-याचीही दृष्टी कमजोर झाली असेल तर त्यांना चष्मे लावावे लागतील.’

इस्लामच्या यशाचे रहस्य बंधुभावात : मोहंमद आझम
संमेलनाचे अध्यक्ष मोहंमद आझम म्हणाले की, भाषेचे सामर्थ्य मराठी आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मात दोन भाषा, दोन संस्कृती, दोन धर्म यात साम्यता आहे. सध्या वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते दूर करण्यासाठी सुफी पंथाचे विचार महत्त्वाचे आहे. हिंदू आणि सुफी संतांचे विचार सारखेच आहेत. मात्र, मराठी भाषेत सुफी संत आणि त्यांच्या कामगिरीवर फारसे लिखाण झालेले नाही. हिंदू लेखकांवर हिंदू राष्‍ट्रवादाच्या सिद्धांताचा प्रभाव आहे. त्यामुळे सुफी संत आणि धर्मांतर यालाच त्यांनी प्राधान्य दिले आहे. इस्लामच्या यशाचे रहस्य त्याच्या बाहुबलात नसून, माणसा- माणसांत बंधुभाव प्रस्थापित करण्याच्या त्याच्या तत्त्वज्ञानात आहे.
लेखकाने भांडखोर असावेच
संवेदनशील लेखक नेहमीच व्यवस्थेशी भांडत असतो. लेखक भांडखोर असेल तरच साहित्य धारदार होईल. मुस्लिम साहित्य संमेलनातून मराठी साहित्य समृद्ध होईल. त्यामुळे साहित्याची पुनर्मांडणी होणार असल्याचे डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.

मी त्यातला नाही : दरेकर
डॉ. कोत्तापल्ले यांच्या भाषणाचा धागा पकडून मनसे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘मी त्यातला राजकारणी नाही. मला अशा समारंभाला जाण्याची गरज पडत नाही. माझ्या मतदारसंघात अत्याधुनिक पद्धतीने तीन ग्रंथालये उभारली आहेत. आपल्या संमेलनस्थळी असलेल्या प्रत्येक साहित्याची प्रत मी ग्रंथालयात ठेवेन.’

राजकारणी, पत्रकार लक्ष्य
‘ब-या चदा पुढा-याना मनात नसलेल्या गोष्टी कराव्या लागतात. लग्नसमारंभ, बारसे आणि अंत्ययात्रेला जाणे हे काम त्यांना आवर्जून करावे लागते. मग मतदारसंघात विकासाची कामे नाही केली तरी चालते?साहित्य संमेलनासाठी चिमूटभर अनुदान देतात अन् त्याचा मोठा गाजावाजा करतात. मराठी चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये अनुदान देतात अन् साहित्य संमेलनासाठी मात्र त्यांच्याकडे पैसा नसतो,’ असा टोला कोत्तापल्लेंनी नेत्यांना लगावला. ‘सध्या पत्रकार, चॅनल्सवाले स्वत:च्या मनातल्या गोष्टी समोरच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतात,’ अशा शब्दात त्यांनी माध्यमांनाही चिमटा काढला.