आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्म्याचा फटका, खिशाला चटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र रूप धारण करू लागला आहे. सूर्य आग ओकू लागल्याने गेल्या तीन वर्षांनंतर पुन्हा तापमान 44 अंशावर पोहचले आहे. त्यामुळे दिवस आणि रात्री प्रचंड उकाडा जाणवत असल्याने लोक घामाघूम होत आहेत. गरमीपासून सुटका मिळविण्यासाठी शहरवासी मोठय़ा प्रमाणात पंखे, कूलर, एसीचा वापर करीत असल्याने एका महिन्यात विजेच्या वापरात 20.56 दशलक्ष युनिटची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात सहा तासांचे भारनियमन सुरू असतानाही विजेची मागणी वाढली आहे. वीजयुनिटच्या दरातही वाढ झाली आहे, परिणामी याचा आर्थिक फटकाही वीजबिलाच्या रूपातून ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.

आयपीएल व एसीचा परिणाम
दरवर्षी पावसाळा आणि हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात विजेचा वापर अधिक होतो. उन्हाळ्यात गरमी जास्त असल्याने पंखे, कूलर, रेफ्रिजरेटर, एसीवर तसेच बर्फ आणि थंडपेय तयार करणार्‍या कारखान्यात विजेचा अधिक वापर होतो. त्यातच सध्या आयपीएल क्रिकेट मॅच सुरू असल्याने दूरदर्शन संच रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे विजेचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.

एक लाख ग्राहक वापरतात जास्त वीज
उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी ग्राहक विजेचा अधिक वापर करून थंड हवा घेत आहेत. पण त्याच्या बदल्यात शहरातील जवळपास एक लाख वीज ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार असल्याने त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. एप्रिल, मे, जून आणि जुलै मध्येदेखील तापमान वाढलेले असते. मान्सून सक्रिय झाल्यामुळे आकाशात ढगांची गर्दी होऊन बाष्प तयार होते. यामुळे आद्र्रता वाढते आणि उकाड्यात वाढ होते.

शहरात एप्रिलमध्ये 82 मेगा युनिट विजेचे वितरण
आठ दिवसांपासून कमाल तापमान 40 अंशाच्यावरच आहे. रात्रीच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसाबरोबरच रात्रीही उकाडा वाढल्यामुळे विद्युत उपकरणाचा वापर वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महावितरणने क्रॉम्पटनला जानेवारीत 64 मेगा युनिट, फेब्रुवारीत 59 मेगा युनिट तर मार्चमध्ये 71 मेगा युनिट, एप्रिलमध्ये 82 मेगा युनिट विजेचे वितरण केले आहे. मार्च महिन्यात त्यामध्ये 12 मेगा युनिटची वाढ होऊन 153 .83 दशलक्ष युनिट वीज खर्च झाली आहे. पावसाळ्यात हेच प्रमाण 534.90 तर हिवाळ्यात 490 .70 दशलक्ष युनिट इतके असते. यात उन्हाळ्यात आतापर्यंत 28.67 टक्क्यांनी वाढ होऊन 612.45 दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला आहे. विजेचा हा अतिरिक्त वापर जून व जुलै महिन्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता वीजवितरण कंपनीच्या अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.

टंचाईमुळे कूलरऐवजी एअर कंडिशनवर तिप्पट खर्च
पाणीटंचाईमुळे एअर कूलरऐवजी बहुतांश लोक एअर कंडिशनचा वापर करीत आहेत. एअर कंडिशन्ससाठी तिप्पट विजेचा वापर होत आहे. मार्च महिन्यापेक्षा एप्रिल, मे , जून आणि जुलै महिन्यात अधिक विजेचा वापर होतो. वीज कमी पडणार नाही, मात्र ग्राहक विजेचा अधिक वापर करणार असल्याने वीजबिल अधिक येईल. भवानीप्रसाद राव, प्रभारी युनिटहेड क्रॉम्प्टन