आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीबाधित 533 बालके सकस आहाराअभावी कोमेजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उपचारादरम्यान घ्यावी लागणारी औषधी पचविण्यासाठी अपेक्षित सकस आहार मिळत नसल्याने एड्सग्रस्त सुमारे 533 बालके ऐन फुलण्याच्या वयात कोमेजत आहेत. देशाच्या उद्याच्या भविष्यासमोर अंधार निर्माण झाला असून त्यासाठी मदतीचा हात मिळतो का यासाठी त्यांच्या नजरा आधारवडाचा शोध घेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात सहा महिने ते 14 वर्षे वयोमान असलेल्या तब्बल 533 मुलांना एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची नोंद आहे. या मुलांवर सरकारी दवाखान्यात औषधोपचार सुरू आहे. यातील बहुसंख्य मुलांच्या पालकांना याच आजाराने ग्रासलेले असून त्यापैकी काहींची आई तर काहींचे वडील तर बहुसंख्य मुलांचे आई व वडील यांचा या आजाराने मृत्यु झाला आहे. त्यामुळे ऐन लहान वयात कोणताही दोष नसताना ही मुले मामा, मावशी, काकांकडे राहत आहेत. तर काही मुले थेट आश्रमगृहात राहून जीवन कंठत आहेत. या मुलांच्या पालकांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ते केवळ सरकारी दवाखान्यात जाऊन त्यांच्यावर उपचार करू शकतात. परंतु त्या गोळ्या पचविण्यासाठी लागणारा सकस व पौष्टिक आहार देण्याची त्यांची ऐपत नाही. अशा परिस्थितीत योग्य आहाराशिवाय औषधोपचार सहन करणे त्या बालकांना शक्य नाही. पीडित बालके लहान असल्याने त्यांची बाजू मांडण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे या मुलांना योग्य आहार कोठून मिळेल याची प्रतीक्षा लागून आहे.

दोघींनी हाती घेतला अजेंडा
अठरा वर्षांपेक्षा मोठय़ा रुग्णांना स्वत:च्या कमाईतून पौष्टिक आहार उपलब्ध होऊ शकतो. परंतु सरकार दप्तरी नोंदणी झालेल्या 533 मुले परावलंबी असल्याने त्यांच्यासाठी सकस आहार मिळविण्यासाठी वंदना पवार यांच्या संजीवनी बहुउद्देशीय संस्थेने तसेच अनिता पाटील यांच्या पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही एड्स या संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ते समाजातील दानशूर व्यक्तींच्या भेटी घेऊन मदतीचा हात मागत आहेत.

डॉक्टरांनी घेतला पुढाकार
मदत म्हणून पैसे देण्यापेक्षा एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांना थेट सकस आहार खरेदी करून देण्यासाठी डॉ. रीतेश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्यासोबत काही डॉक्टरांनीही मदतीचा हात पुढे केला. आपल्या उत्पन्नातील काही रक्कम महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. काही डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटलमधील ओपीडी व वेटिंग रूममध्ये मदतीचे आवाहन करणार आहेत. यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्ण व नातेवाइकांच्या माध्यमातून पीडितांच्या वाढीसाठी मदत मिळू शकणार आहे. यासाठी डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने पुढाकार घेतला तर मोठा प्रश्न सुटू शकणार आहे. डॉक्टरच या मुलांच्या व्यथा जास्त जाणू शकतात.

असा आहे सकस आहार
बालकांना महिन्याकाठी 1200 ते 1500 रुपयांचा सकस व पौष्टिक आहाराची गरज असते. दररोज अर्धा लिटर दूध, गूळ, शेंगदाणे, बिट, अंजीर, काळे मनूक, खजूर, सोयाबीन, तांदूळ व अन्य पदार्थांचा समावेश आहे. दरम्यान, प्रौढांसाठी संजय गांधी निराधार योजनेतून दर महिन्याला 600 रुपये न्युट्रिशियनसाठी मिळतात. बालकांसाठी योजना नाही. महिन्यातून एकदा पोषक आहार वाटप होत असताना अनिता पाटील यांच्या कार्यालयात प्रचंड गर्दी होते.