आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिन? छे! हॉलिडे, पार्टी टाइम!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सलग सुट्यांसाठी प्रजासत्ताक दिन फायद्याचा ठरल्याने नोकरवर्ग जाम खुश आहे. कारण हॉलिडे प्लॅनिंगसाठी सोईची सुटी एवढेच प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व उरल्याने पार्टी टाइम मूडमध्ये शासकीय कार्यालये आणि शाळांपुरतीच देशभक्ती र्मयादित झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, सलग सुट्यांमुळे पार्टी, शॉपिंग, पिकनिक प्लॅनिंगमुळे एटीएम यंत्रणा कोलमडली आहे. तसेच बॅँकांनीही ग्राहकांना एटीएमभरोसे सोडले आहे.

ईद-ए-मिलाद, प्रजासत्ताक दिन आणि रविवार या जोडून आलेल्या सुट्यांमुळे बँका बंद आहेत. तीन दिवसांच्या सुट्यांमुळे आर्थिक व्यवहार थांबल्याने सारी भिस्त शहरातील एटीएमवर आहे. शहरातील विविध भागांमध्ये खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे 54 एटीएम सुट्यांमध्ये सज्ज ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने व्यवहारांवर फारसा फरक पडणार नसल्याने आणि सुट्या गृहीत धरून ग्राहकांनीदेखील नियोजन केल्यामुळे व्यवहारांवर परिणाम होणार नसल्याचा अंदाज बँकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तीन दिवस क्लिअरिंग हाऊसदेखील बंद राहणार आहे.

हॉलिडे मूडसाठी विशेष दक्षता : प्रजासत्ताक दिनामुळे नियोजन सोईचे गेल्याने एन्जॉय आणि खर्चाचा ताळमेळ बसवताना एटीएमवर लोड येणार आहे. ही शक्यता गृहीत धरून बॅँकादेखील एटीएमवर अवलंबून सुटीचा आनंद लुटत आहेत. संप व सलग सुट्यांमुळे तीन महिन्यांत चार वेळा बँकांचे व्यवहार थांबले. एटीएमचा वापर वाढल्याने दोन महिन्यात स्टेट, अँक्सिस बँकेने एटीएमची संख्या वाढवली. आयडीबीआयनेदेखील गणपतीनगरात नव्या शाखेसह एटीएम सुविधा सुरू केली आहे. अँक्सिस, एचडीएफसी, महाराष्ट्र व स्टेट बँकेने एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी एजन्सीला काम दिले असल्याने सुटीच्या काळातही पैसे भरण्याची जबाबदारी एजन्सीवर असणार आहे.

दोन दिवसांच्या प्रवासाचे नियोजन - शुक्रवार ते रविवारपर्यंत तीन दिवसांच्या सुटीचा योग साधून नागरिकांनी पर्यटनावर भर दिला आहे. तसेच सलग सुट्यांमुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही शॉर्ट टूरचे नियोजन केले असून, शहरातील नोकरदारवर्गाने त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. दोन दिवस प्रवास आणि एक दिवस एन्जॉय करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यासाठी 400 ते 500 किलोमीटरपर्यंतच्या पर्यटनासाठी नागरिकांनी कूच केले.

जळगाव शहरातील सुमारे 700 ते 800 कुटुंबांनी सुटी पर्यटनासाठी उपभोगली. कोकण, पंचमढी, माथेरान येथे जाण्याकडे जास्त कल होता. गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसा प्रवास, तर रविवारी दिवसा आणि रात्री परतीचा प्रवास असे नियोजन करून किमान दोन दिवस एन्जॉय करण्यासाठी नागरिक शहरातून बाहेर पडले आहेत. काही जण देवदर्शनासाठी गेले आहेत. त्यात शेगाव, शिर्डी आणि वणी येथे जाण्याचा बेत अनेकांनी आखला. शहरातील नेचर टूर्स कंपनीतर्फे सुमारे 150 नागरिकांनी मध्य प्रदेश, माथेरान आदी ठिकाणचे बुकिंग केल्याची माहिती संचालक समीर देशमुख यांनी दिली.