आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

205 मालमत्ताधारकांना दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील मालमत्तेची तपासणी करण्यासाठी महापालिकेतर्फे मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यात मालमत्तेची मोजणी करण्यात आली. या वेळी 787 मालमत्ताधारकांनी वाढीव तर काहींनी परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांना दंड करण्यात येऊन वसुली करण्यात येणार आहे.
शहरातील एकेका भागाचा सर्व्हे करण्यात येत आहे. यात घरांचे मोजमाप करणे आणि नवीन बांधकामांची नोंद करून त्यांना घरपट्टी लागू करण्यात येत आहे. शहरात विनापरवाना नवीन बांधकाम व वाढीव बांधकाम करणा-या मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आता महापालिका प्रशासन दंडाची वसुली करणार आहे. सद्य:स्थितीत महापालिकेच्या रेकॉर्डवर 70 हजार मालमत्तांची नोंद आहे. तर साधारणपणे 40 कोटींवर वसुलीची रक्कम मनपाकडे येण्याची गरज आहे. महापालिकेने मालमत्ता तपासणी मोहीम सुरू केल्यापासून जुलै महिन्यापर्यंत 787 मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यातील 582 मालमत्ताधारकांनी बांधकामाची परवानगी व वाढीव बांधकाम नियमित करून घेण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे कागदपत्र देऊन परवानगीसाठी प्रकरण दाखल केले आहे. तर उर्वरित 205 मालमत्ताधारकांकडून दंड आकारण्याची कारवाई करण्यासाठी वसुली विभागाला यादी प्राप्त झाली आहे.
अनधिकृत बांधकामांना दुप्पट दंड
शहरातील अनधिकृत बांधकाम केल्यानंतर त्याची परवानगी न घेतल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतरही ज्यांनी परवानगीसाठी अर्ज केला नाही, अशा मालमत्ताधारकांकडून दुप्पटची घरपट्टी दंड म्हणून वसूल केली जाऊ शकते.