आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - दीपनगर विस्तारित प्रकल्पातील हॉपर दुर्घटनेला पाच दिवस पूर्ण झाल्यावरही राखेखाली दबलेल्या दोन मजुरांच्या मृतदेहांचा शोध लागलेला नाही. पाच दिवसांपासून अहोरात्र ढिगारा उपसण्याचे काम सुरू असतानाही केवळ 60 टक्केच राख उचलली गेली आहे. हॉपरमधून अजूनही राख पडत असल्याने कनेक्टिंग प्लेट आणि ढिगारा उचलण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान मंगळवारी खासदार हरिभाऊ जावळे, महाजनकोचे कार्यकारी संचालक ए. आर. नंदनवार आणि बी. के. यादव यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
दीपनगर केंद्रातील दुर्घटनेत राजेंद्र उर्फ बापू र्शीराम जंजाळकर आणि कन्हाळे येथील नीलेश कमलाकर चौधरी हे दोन कामगार राखेच्या ढिगार्याखाली दाबले गेले. या अपघातात अवजड कनेक्टिंग प्लेटही तुटल्याने ढिगारा उपसण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या गॅस कटरने कनेक्टिंग प्लेट तोडल्या जात आहेत. मात्र, या प्रक्रियेत हॉपरमध्ये साचलेली राख पुन्हा खाली कोसळत आहे. प्रकल्प संचालक चंद्रकांत थोटवे आणि कार्यकारी संचालक व्ही. पी. सिंग यांनी भेट दिल्यानंतर मंगळवारी कार्यकारी संचालक नंदनवार आणि यादव यांनी पाहणी केली. खासदार हरिभाऊ जावळे यांनी एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) च्या अधिकार्यांकडून अपघाताची प्राथमिक माहिती घेतली. चौकशीचा अहवाल योग्य पद्धतीने तयार करून सादर करण्याच्या सूचना जावळे यांनी अधिकार्यांना दिल्या. त्यांनी दोन्ही कामगारांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, गुरुजितसिंग चाहेल, प्रशांत पाटील, पंचायत समिती सदस्य गोलू पाटील उपस्थित होते.
दरम्यान, या पूर्वीही दीपनगर येथील औषिण्क विद्युत केंद्रात अशा प्रकारच्या घटना घडून अनेक मजूरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनांचा बोध घेऊन या केंद्रात मजूरांच्या सुरक्षेविषयी कोणतेही ठोस उपाय न करण्यात आल्याचे या घटनेवरुन दिसून येते. तर आगामी काळात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाय करण्याची आवश्यकता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.