आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोक्याचा इशारा देणार्‍या यंत्रणेत दोष; इंटिगेशन प्रणालीकडील दुर्लक्ष भोवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- विस्तारित वीजनिर्मिती प्रकल्पात 18 ऑक्टोबर रोजी राखेचे हॉपर कोसळून दोघा मजुरांचा मृत्यू झाला असून कोट्यवधंची वित्तहानी झाली आहे. दुघर्टनेची चौकशी करण्याचा कंत्राट नॅशल थर्मल पॉवर कार्पोरेशनला देण्यात आला होता. मात्र, त्यांनी याबाबत आपला अभ्यास कमी असल्याचे सांगून अहवाल देणे टाळले. त्यामुळे आता या दुर्घटनेची चौकशी सीपीआरआयकडे सोपवण्यात आली आहे. तज्ज्ञांची टीम गुरुवारीच दीपनगरात दाखल झाली आहे. गेली तीन दिवस ही टीम तळ ठोकून आहे.
प्रत्येक हॉपरमध्ये किती प्रमाणात राख भरली गेली, याचा अंदाज येण्यासाठी इंटिगेशन प्रणाली बसवण्यात आलेली असते. मात्र, दीपनगर प्रकल्पात जो अपघात झाला तेथे ही प्रणाली पाहिजे त्या प्रमाणात काम करत नव्हती. काही ठिकाणी इंटिगेशन सुरू असले तरी 100 टक्के अर्थात 14 हजार मेट्रिक टन राख भरल्यानंतर इंटिगेशन 100 टक्के आकडा दाखवून थांबत होते. मात्र, त्यानंतरही हॉपरमध्ये राख सुरूच ठेवल्याने ते कोसळले, असा प्राथमिक अंदाज सीपीआरआयच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे हॉपर हे इंटिगेशन प्रणालीतील दोषामुळे कोसळले असल्याचा प्राथमिक अंदाज सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी पाहणी करून व्यक्त केला आहे. हॉपर दुर्घटनेचा वस्तुनिष्ठ पण चिकित्सक अहवाल महिनाभरात देण्यात येईल. एवढेच नव्हे तर या अहवालात घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचनाही करण्यात येणार असल्याचे बंगळुरू येथील ‘सीपीआरआय’च्या पथकातील तज्ज्ञांनी प्रकल्पस्थळी ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत करताना सांगितले.
विश्वासात घ्यावे
सीपीआरआयच्या टीमने स्थानिक पर्यावरणप्रेमी, संस्थांना विश्वासात घेऊन पाहणी करताना बोलावले पाहिजे. जणेकरून येथील समस्या जाणून अहवालात अधिक स्वयंस्पष्टता येण्यास मदत झाली असती.
-सुरेंद्र चौधरी, सचिव, उपज संस्था
महिनाभरात अहवाल
संच क्रमांक पाच बायपास करून कार्यरत करण्यात आला आहे. सीपीआरआयच्या तज्ज्ञांकडून पाहणी सुरू आहे. इंटिगेशन, हॉपर आणि इतर प्रणाली अद्ययावत होईल. महिनाभरात वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर होईल.
-डी. एस. डकाते, उपमुख्य अभियंता, वीजनिर्मिती प्रकल्प, दीपनगर
योग्य उपाय सुचवू
हॉपर कोसळण्याची दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रभावी उपाय सुचवण्यात येतील. प्रकल्पाची प्राथमिक पाहणी केली आहे. लवकरच सचित्र अहवाल प्रसिद्ध केला जाईल. प्राथमिक निष्कर्ष सध्या नोंदवण्यात आले आहेत.
-शेखर कुमार, तज्ज्ञ, सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगळुरू
रायचूरलाही झाली होती दुर्घटना
कर्नाटकातील रायचूर येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील भेल कंपनीने दीपनगर प्रकल्पातील डिझाइन प्रमाणेच इएचपी अर्थात हॉपर यंत्रणा उभारली होती. तेथेही इंटिगेशन, व्हॅक्युम आणि सेलो यंत्रणा फारशी कार्यान्वित नसल्याने ए पासून ते डीपर्यंतच्या हॉपरचे पास जानेवारी 2013 मध्ये कोसळले होते. या कामाची पाहणी करून सीपीआरआयने अहवाल सादर केला आहे. त्याचाही उपयोग दीपनगरातील दुर्घटनेचा शोध घेण्यासाठी सीपीआरआयच्या तज्ज्ञांना सुलभ होणार आहे. रायचूर आणि दीपनगरातील दुर्घटनेत काही साम्य आढळते काय? याची शक्यताही या तज्ज्ञांच्या पथकाकडून चिकित्सकपणे तपासली जात आहे.
व्हॅक्युम, सेलो प्रणाली बंद
दीपनगरच्या विस्तारित वीजनिर्मिती प्रकल्पातील व्हॅक्युम आणि सेलो प्रणाली बंद असल्याने हॉपरमधून राख वेळेवर काढण्यात आली नाही. हे कारणसुद्धा हॉपर कोसळण्यास कारणीभूत असू शकते. दुर्घटनेची कारणमीमांसा करून उपाययोजनांचा स्वयंस्पष्ट अहवाल येत्या महिनाभरात प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हॉपर दुर्घटनेला कोणती खासगी अथवा शासकीय कंपनी जबाबदार आहे? हे निश्चित होईल. यात सीपीआरआयकडून ज्या मार्गदर्शक सूचना केल्या जातील, त्या दीपनगर प्रकल्प प्रशासनासाठी पथदर्शी ठरू शकतात.
काय असते इंटिगेशन प्रणाली?
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील हॉपरमध्ये इंटिगेशन प्रणाली कार्यान्वित असते. हॉपरच्या डिझाइननुसार वजन पेलून धरण्याची क्षमता गृहीत धरून त्यावर इंटिगेशन सेट केले जाते. निर्धारित क्षमतेइतकी राख भरल्यावर इंटिगेशन 100 टक्के आकडा दाखवून प्रकल्प स्वयंचलित प्रकाराने बंद करते. दीपनगरात मात्र, 14 हजार मेट्रिक टन क्षमता असतानाही हॉपरमध्ये 17 हजार मेट्रिक टन राख भरल्यावरही प्रकल्प स्वयंचलित पद्धतीने बंद झाला नाही. सेन्सर प्रणाली कार्यरत असती तर हॉपर किती भरले? याची माहिती मिळाली असती, असा निष्कर्षही बंगळुरू येथील सीपीआरआयच्या पथकातील तज्ज्ञांनी काढला आहे.
यंत्रणेतील दोषांकडे दुर्लक्ष
वीजनिर्मिती प्रकल्पातील हॉपर दुर्घटनेला यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत. सीपीआरआयच्या तज्ज्ञांकडून स्वयंस्पष्ट अहवाल आल्यावर दुर्घटनेची जबाबदारी लवकरच निश्चित केली पाहिजे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा हॉपर दुर्घटनेबाबतचा अभ्यास कमी असल्याचे दिलेले उत्तर हा संशोधनाचाच विषय आहे.
- राजेंद्र चौधरी, पर्यावरणप्रेमी, भुसावळ