आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hospital News In Marathi, Hospital Building News At Jalgaon, Divya Marathi

सिव्हिलच्या नव्या इमारतीत कोसळले स्लॅबचे प्लास्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील प्रसूती विभागातील स्लॅबचे प्लास्टर दुपारी तीनच्या सुमारास अचानक कोसळले. सुदैवाने घटनास्थळी कुणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. पाचच महिन्यात बांधकामाचा दर्जा या घटनेमुळे समोर आला.
इमारतीसाठी चार कोटींचा खर्च
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन इमारतीचे काम सार्वजनिक विभागाने वर्धमान भंडारी या ठेकेदाराला दिले होते. या इमारतीसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अजून या इमारतीचे औपचारिक उद्घाटनही झालेले नाही. त्या आधीच स्लॅबचे प्लास्टरचा काही भाग कोसळला आहे.
पाच महिन्यांत बांधकामाचा दर्जा दिसला
सप्टेंबर 2010 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली. तीन वर्षे काम सुरू होते. खरे तर मार्च 2013 पर्यंत या इमारतीचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र सात महिने उशिरा इमारत जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यातच इमारतीचे बांधकामाचा दर्जा आजच्या घटनेने समोर आला आहे.
बघितल्यानंतर कारवाई करणार
जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधण्याचा ठेका वर्धमान भंडारी या ठेकेदारास देण्यात आला होता. उद्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन नेमकी काय घटना घडली आहे. ते बघितल्यानंतर कारवाई करण्यात येईल. संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
संबंधित विभागांना पत्र लिहिणार
नवीन इमारतीतल्या प्रसूती विभागाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याचे कळले आहे. यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिणार असून घटनेची चौकशी केल्यानंतर कारवाईची दिशा ठरवण्यात येईल. डॉ.एस.एन.लाळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक
शल्यचिकित्सकांच्या आग्रहाखातर
नव्या आणि जुन्या इमारतीला जोडणारा हा भाग आहे. तांत्रिकदृष्ट्या या भागात आकुंचन, प्रसरणाने स्लॅब सैल झाल्याने हा प्रकार झाला आहे. शिवाय इमारतीच्या प्लॅनमध्ये इमारत जोडण्याचे नव्हते. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आग्रहामुळे आम्ही हे बांधकाम केले आहे. उद्याच या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येईल. - वर्धमान भंडारी, ठेकेदार.
इमारतीसाठी आंदोलन
प्रसूती विभागाच्या जुन्या इमारती शेजारी असलेल्या सीटी स्कॅन विभागाचे काम सुरू असल्याने त्याची स्थिती अतिशय खराब झाली होती. त्यामुळे राजकीय पक्षांनी आंदोलन करून स्वत:च रुग्णांना या विभागात हलविले होते. त्यानंतर आरोग्य विभागाचे उपसंचालक डी. डी.पवार यांनी भेट देऊन हा विभाग लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते.
हे विभाग आहेत इमारतीत
जिल्हा रुग्णालयाच्या या नवीन इमारतीतील विभाग 100 खाटांचे आहेत. त्यात बालरुग्ण विभाग, प्रसूती विभाग आणि नवजात शिशू अतिदक्षता विभाग आहे.