आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षानिमित्त होणार हॉटेलांची तपासणी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - नववर्षाचा जल्लोष होण्यापूर्वीच अन्न व औषध विभागाने हॉटेलांकडे वक्रदृष्टी केली आहे. हॉटेल्सची तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे. नववर्षाचे घरगुती कार्यक्रम जसे होतात. त्यापेक्षा जोरात हॉटेलमध्ये कार्यक्रम होतात. त्यासाठी हॉटेल्समध्ये आतापासूनच तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेलातील अन्न पदार्थांची तपासणी अन्न व औषध विभागातर्फे होणार आहे.

नववर्षाचे वेध शहरवासीयांना लागले आहे. नववर्षाच्या स्वागताची सर्वजण तयारी करीत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेरगावी अथवा शहरातील हॉटेल्समध्ये सहकुटुंब जाऊन सहभोजनाचा आनंद घेतला जातो. हॉटेल व्यावसायिकांचीही यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. हॉटेलवर रोशणाई आणि स्पेशल मेन्यू त्यासाठी तयार करण्यात येतो. विशेष स्टॉलही लावण्यात येतात. विविध प्रकारच्या डिशेश आणि स्वादिष्ट पदार्थांची लयलूट करून ग्राहकांसाठी पर्वणी दिली जाते. याबरोबरच काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. हॉटेल व्यावसायिकांनी खाण्याच्या पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मोठय़ा हॉटेल्ससह शहरातील छोटे हॉटेल आणि फास्ट फूडवरही नागरिक चांगलाच ताव मारतात. शहरात सद्य:स्थितीत साधारणपणे दोनशे ते अडीचशे रस्त्यावरील स्टॉलधारक आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी सारेच हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

गर्दीमुळे अन्नाची असुरक्षितता
दि. 31 डिसेंबर रोजी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद नागरिक घेतात. गर्दी वाढल्याने हॉटेलात वाट पाहावी लागते. त्यामुळे भराभर ऑर्डर पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असल्याने अन्नाची सुरक्षितता, त्याची स्वच्छता आणि दर्जा यांची सांगड घालणे अनेकांना कठीण होऊन दुर्लक्ष होण्याचाच प्रकार अधिक घडतो. त्यासाठी या सर्वांची तपासणी सर्व हॉटेल, स्टॉल्सवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक आणि अधिकारी जाऊन करणार आहेत. यासाठी असलेल्या निकषाचीही तपासणी या वेळी करण्यात येईल. तसेच अन्नाचे नमुनेही घेण्यात येतील. शहरात रस्त्यावर स्टॉल लावणार्‍या व्यावसायिकांना अन्न प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शहरात नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश हॉटेल्समध्ये कुटुंबांसाठी जागा राखीव ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात 2900 हॉटेल परवाने
हॉटेल व्यवसायासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे परवाने घेण्यात येतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यात साधारणपणे 2900 हॉटेल व्यावसायिकांना परवाने देण्यात आले आहेत. वर्षाला 12 लाख रुपयांची उलाढाल असणार्‍या व्यावसायिकांना परवाने घ्यावे लागतात. यातील बहुतांश हॉटेल्स महामार्गालगत आहेत. त्यांच्यावर या विभागाची नेहमी करडी नजर असते. कारवाईही बर्‍याचदा केली जाते.

5 हजार व्यावसायिकांची नोंदणी
जिल्ह्यातील छोटे हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावर हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या व्यावसायिकांची नोंदणी करण्यात येते. याप्रमाणे ही नोंदणी विभागातर्फे करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच हजार व्यावसायिकांची नोंदणी करण्यात आली आहे. व्यावसायिकांची नोंदणी होत असली तरी हॉटेल्सची नोंदणी मात्र प्रशासनाकडे झालेली नसते. त्यामुळे या हॉटेल्स नजरेखाली असतात.