आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकीत येऊन घरफोडी; लाखोंचा एेवज लांबवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात चाेरट्यांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मध्यरात्री भरपावसात चारचाकीवर अालेल्या चाेरट्यांनी पिंप्राळा परिसरातील असावानगरातील एका पाॅश बंगल्यात चाेरी केली. या चाेरट्यांनी दरवाजा ताेडून घरातील लाखोंचा एेवज लंपास केला. याच बंगल्यात १० वर्षांपूर्वीदेखील दराेडा पडला हाेता. बुधवारीदेखील भरदिवसा यशवंतनगरातून एका अपार्टमेंटमध्ये चाेरी झाली अाहे.

पिंप्राळ्यातील असावानगर येथे सोमनाथ मानकचंद काबरा हे पत्नी सुमन यांच्यासह ‘मातोश्री’ या बंगल्यात राहतात. गेल्या १० दिवसांपासून ते मुंबईला मुलगा दीपक यांच्याकडे गेले होते.
त्यांचानातू हाँगकाँग येथे जाणार असल्यामुळे काबरा दाम्पत्य १० दिवसांपासून त्याला भेटण्यासाठी मुंबईत होते. दरम्यान, भोईटेनगर येथे राहणारे काबरा यांचे पुतणे पवन प्रेमराज काबरा हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दर दोन-तीन दिवसांअाड बंगल्यावर येऊन पाहणी करीत होते. मंगळवारनंतर ते गुरुवारी सकाळी ९.३० वाजता काबरांच्या बंगल्यात आले. मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून ते घरात गेल्यानंतर त्यांना उजव्या हाताला असलेल्या बेडरूममधील कपाट, ड्राॅवर उघडे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून अाले. त्यामुळे प्रेमराज हे घाबरून पुन्हा हॉलमध्ये आले. काही सेकंदांत स्वत:ला सावरून त्यांनी किचनमध्ये प्रवेश केला. किचनचा मागचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तर याच दरवाजाच्या बाहेर असलेला लोखंडी दरवाजा ताेडलेला होता. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रेमराज यांनी काका साेमनाथ यांना फोन करून माहिती दिली. तसेच रामानंदनगर पोलिस ठाण्यातही कळवले. चोरट्यांनी लोखंडी दरवाजा तोडून खिडकीतून हात टाकून किचनच्या दरवाजाची कडी उघडून प्रवेश केल्याचे दिसून येते. त्यानंतर चाेरट्यांनी पहिल्या दुसऱ्या मजल्यावरील दोन्ही बेडरुममधील सर्व दिवे सुरू करून कपाटे, ड्राॅवरचे लॉक तोडून साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास करून पोबारा केला आहे. दरम्यान, त्यांनी कॅमेरे, मोबाइल, गॉगल, घड्याळ यासारख्या वस्तू बेडवरच सोडल्या होत्या. त्यावरून हे सराईत चोरटे असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२००७मध्ये याच बंगल्यात दरोडा
सन२००७ मध्ये या बंगल्यात डॉ.महेश बिर्ला हे राहत हाेते. त्या वेळी या बंगल्यात दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी डॉ.बिर्ला यांच्या गळ्यावर चाकू ठेऊन धमकावत ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी बंगल्याचे नूतनीकरण करण्यासाठी डॉ.बिर्ला हे समोरच राहणाऱ्या मेढे यांच्या घरात तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी गेले होते. तेंव्हा मेढे यांच्या घरातून सुद्धा डॉ.बिर्ला यांच्या सामानाची चोरी झाली होती. या दोन कटू घटनांमुळे आपण त्या परिसरातील रहिवास सोडल्याचे डॉ.बिर्ला यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
चारचाकीचे टायरही चोरी
असावानगरातीलच भवानी मंदिर परिसरातील विद्यानगर येथील दिलीप पाटील यांच्या चारचाकीचे पुढील दोन टायर माताेश्री किरणा दुकानाचा लाेखंडी फलक चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी रामानंदनगरला नोंद करण्यात आलेली नाही.
भरदिवसा अपार्टमेंटमध्ये चोरी
रॉयल टेरेस या अपार्टमेंटमधील नेहा दुधानी यांच्या घरात बुधवारी भरदिवसा चोरी झाली. दुधानी या अमळनेर येथे एलआयसी एजंट आहेत. त्या दररोज अप-डाऊन करतात. बुधवारी सकाळी ८.३० वाजता घराला कुलूप लावून त्या अमळनेरला गेल्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ड्राॅवरमधून आठ हजार रुपये रोख घड्याळ, मोबाइल चार्जर असा ऐवज लंपास केला. दुधानी या रात्री ९.४५ वाजता घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले.
वस्तुंवरील ठसे घेतले
रामानंदनगरपोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले पथकासह घटनास्थळी अाल्यानंतर त्यांनी बंगल्यासह परिसरात तपासणी केली. मागच्या बाजूला सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या बांधकामाशेजारी राहणाऱ्या मजुरांपैकी एकाने पहाटे वाजता या भागातून एक चारचाकी जाताना पाहिली. दोन दिवसांपूर्वी निवृत्तीनगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोरे यांच्या घरात चोरी झाली. तेथे नंबरप्लेटवर चिखल लावलेली चारचाकी जाताना आढळून आली होती. त्यानंतर बुधवारी रात्रीदेखील तेच चोरटे चारचाकीने आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घरामधील वस्तूंवरील हाताचे ठसे घेतले आहेत. वाडिले यांनी पाहणी करताना लोकांना सूचना केल्या. बंगल्याच्या मागच्या बाजूला बरीच मोकळी जागा त्या मागे रेल्वेलाइन आहे. त्यामुळे चोरट्यांनी मागच्या बाजूनेच प्रवेश केला. तसेच त्यांना पळून जाण्यासाठी हा मार्ग सोपा असल्याचे तपासात समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...