आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातशे घरकुलांचे काम प्रगतिपथावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शहरातील चार भागांमध्ये एक हजार 200 घरकुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यातील 700 घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

राज्यातील सर्वच शहरे झोपडपट्टय़ांनी व्यापले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनातर्फे एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या नागरिकांना त्याच ठिकाणी घरे बांधून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरे झोपडपट्टीमुक्त होतील. या योजनेंतर्गत शहरात जुने धुळे, साक्री रोडवरील सिंचन विभागाच्या कार्यालयामागे, ताशा गल्ली, फाशीपूल भागात एक हजार 200 घरकुलांचे काम होणार आहे. या कामावर 33 कोटींचा निधी खर्च होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधी उपलब्ध झाला असून, या निधीतून जुने धुळे आणि साक्री रोड परिसरातील सिंचन विभागाच्या कार्यालयामागे घरकुलांचे काम झाले आहे. या ठिकाणी 700 घरकुलांचे बांधकाम प्रगतीवर आहे. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.

झोपडपट्टय़ांचे निर्मूलन का
झोपड्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना अनेक सुविधा मिळत नाहीत. झोपडपट्टय़ांमध्ये सांडपाणी वाहून जाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने नागरिकांच्या आरोग्यासह शहरांचे सौंदर्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविला जात आहे.

मोहाडीतील घरे धूळखात पडून
झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत शहरातील मोहाडी उपनगरात काही वर्षांपूर्वी सुमारे 900 घरकुलांचे काम करण्यात आले आहे. हे काम दीड ते दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यानंतरही त्यांचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासनातर्फे या घरकुलांचे लवकरच वाटप करण्यात येईल, असे सांगितले जाते ; परंतु ही केवळ घोषणाच ठरत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे घरकुले न वाटपामागे राजकारण असल्याची चर्चा आता होत आहे. दुसरीकडे ही घरकुले शहरापासून लांब अंतरावर असल्याने ती लाभार्थ्यांनी नाकारल्याने वाटपाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.