आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • House Scam: Suresh Jain Shifted Dhule District Hospital

घरकुल घोटाळा प्रकरण: सुरेश जैन यांचा मुक्काम धुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या खोलीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जळगाव घरकुल घोटाळय़ातील संशयित सुरेश जैन यांनी बुधवारी सायंकाळी श्वास घेण्यासह मधुमेहाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जैन यांच्यावर अपघात विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खोलीत उशिरापर्यंत उपचार सुरू होते.
मागील 12 दिवसांपासून धुळे जिल्हा कारागृहात असलेले सुरेश जैन यांची प्रकृती सायंकाळी बिघडली.कारागृहातील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे यांना कळविण्यात आले. कारागृहातून पोलिस मुख्यालयात बंदोबस्तासाठी फोन करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6.45च्या सुमारास सुरेश जैन यांना शासकीय वाहनाने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. अपघात विभागात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांसाठी असलेल्या खोलीत त्यांना ठेवण्यात आले. जैन यांना श्वसन व मधुमेहाच्या त्रासासोबत अतिरिक्त तणावाने शारीरिक थकवा आला होता, असा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे त्यांची ईसीजी व रक्तातील शर्करा मोजण्यात आली. तसेच रक्तातील क्षार मोजण्यासाठी विशेष चाचणीही करण्यात आली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर जैन यांना उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, जैन यांना रुग्णालयात आणताच अवघ्या काही मिनिटांत त्यांचे नातवाईकही दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या खोलीत डॉक्टर व नातलगांशिवाय कोणलाच प्रवेश दिला जात नव्हता.
काय आहे अहवाल..
वैद्यकीय अहवालानुसार सुरेश जैन यांच्या रक्तात क्षारांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच हृदयाचे ठोके कमी-अधिक प्रमाणात पडत असून, अतिरिक्त ताणामुळे त्यांना थकवा जाणवत असल्याचे नमूद आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.