आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • House Scam : Two Case Not But One Case Continue Session Court Judge

घरकुल घोटाळा : दोन खटले चालवण्‍याऐवजी एकच खटला चालवा - विशेष सत्र न्यायाधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल घोटाळाप्रकरणी पोलिस ठाण्यात एकच फिर्याद नोंदवलेली असताना त्याप्रकरणी दोन वेगवेगळे खटले न्यायालयात चालविले जात होते. यापुढे तो एकच खटला म्हणून न्यायालयात चालेल, असा आदेश विशेष सत्र न्यायाधीश क्षीरसागर यांनी आज दिला.


महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुलप्रकरणी पोलिस ठाण्यात एकच फिर्याद दिली आहे. असे असताना न्यायालयात मात्र 4 आरोपींविरुद्ध 4/12 आणि 53 आरोपींविरुद्ध 5/12 क्रमांकाने खटला चालविला जात होता. प्रकरण एकच असताना दोन स्वतंत्र खटले चालविणे योग्य नाही, त्यामुळे न्यायालयाचाही वेळ आणि मेहनत वाया जाते आणि खटल्याचा गुंताही वाढत जातो असा मुद्दा या प्रकरणातील विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थित केला होता. हे दोन्ही खटले एकत्रित चालविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी 21 डिसेंबर 2012 रोजी एका अर्जाद्वारे केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायाधीश क्षीरसागर यांनी आज निकाल दिला. त्यामुळे हे दोन्ही खटले आता 4/12 या क्रमांकाने एक खटला म्हणूनच चालतील.


आरोपींच्या वकिलांचा होता विरोध
दोन्ही खटले हे वेगवेगळे चालवले गेले पाहिजे असा आग्रह काही आरोपींच्या वकिलांनी धरला होता. दोन्ही आरोपपत्रांचा एकत्रीत खटला चालवायला त्यांचा विरोध होता.


चार्ज फ्रेमिंग लांबण्याची शक्यता
दोन खटल्यांच्या एकत्रीकरणामुळे आरोपींवरील आरोप निश्चिती लांबण्याची शक्यता आहे. 4/12 क्रमांकाच्या खटल्यात प्रदीप रायसोनी, राजा मयूर, नाना वाणी आणि पी.डी. काळे हे चारच आरोपी होते. हे चार आरोपी एकत्र येणे आणि त्यांच्यावर आरोप निश्चिती (चार्ज फ्रेम) होणे तुलनेने सोपे होते. आता एकत्रित खटल्यातील आरोपींची संख्या 57 झाली आहे. हे 57 आरोपी एकाच वेळी न्यायालयात हजर राहणे 4 आरोपींच्या तुलनेत कठीण असल्याने आरोपनिश्चिती लांबू शकते.


जामिनासाठीच्या अर्जालाही अडथळा
एकदा का 4/12 क्रमांकाच्या खटल्यातील चार आरोपींवर आरोप निश्चिती झाली असती, त्यानंतर ते जामिनासाठी त्याच न्यायालयात अर्ज करायला मोकळे झाले असते. कारण तसे निर्देश प्रदीप रायसोनी यांच्या अपिलावर निर्णय देताना उच्च् न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. आरोप निश्चितीनंतर प्रदीप रायसोनी यांना किंवा त्यांच्यापैकी कोणाला जामीन मिळाला असता तर इतर आरोपींसाठीही जामीनचा मार्ग निश्चित झाला असता. आता आरोपनिश्चितीच लांबली तर जामीनसाठी अर्ज करण्याची संधीही लांबणार आहे.


एकत्रिकरणामुळे आरोपींचे क्रमांक चारने बदलणार
घरकुल प्रकरणाचा खटला क्रमांक 5/12 मध्ये आमदार सुरेश जैन यांचा आरोपी क्रमांक 1 आहे. हा खटला आता 4/12 क्रमांकाच्या खटल्यात एकत्र करण्यात आल्यामुळे त्यांचा आरोपी क्रमांक 05 होणार आहे. याच पद्धतीने 5/12 खटल्यातील सर्वच आरोपींचा क्रमांक चाराने वाढणार आहे. अर्थात, या क्रमांकाचा न्यायालयीन कामकाजावर काहीही परिणाम होत नाही. 120 ब आणि 34 हे कलम लावले असेल तर खटल्यातील क्रमांक काहीही असला तरी सर्व आरोपींना सारखेच मानले जाते, असे कायदा सांगतो.


पुढे काय?
घरकुल घोटाळ्यातील आरोपी विजय कोल्हे पोलिसांना आढळून आलेले नाही. मात्र दोषारोपात त्यांचे नाव आहे. आरोपनिश्चितीच्या वेळीही ते पोलिसांना मिळाले नाही तर आधी त्यांच्या फरार असण्याची उद्घोषणा पोलिसांना करावी लागेल. त्यासाठी 30 दिवसांची मुदत आरोपीला द्यावी लागते. ती प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण केलेली नाही. म्हणजे केवळ त्या एका कारणासाठीही आरोपनिश्चिती महिनाभरासाठी लांबू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.