आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिक्षा : बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यात व्हॉट्सअॅपचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बारावीची परीक्षा शनिवारपासून सुरू होत आहे, तर दहावीच्या परीक्षेला मार्चमध्ये प्रारंभ होईल. मात्र, या परीक्षांमध्ये ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियान राबवण्यात व्हॉट्सअॅप हे शिक्षण विभागासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. हल्ली सोशल नेटवर्किंगमुळे संपर्क साधणे सुलभ झाले. मात्र, त्याचा अडथळा परीक्षा पद्धतीला होणार आहे.
परीक्षा केंद्रांमध्ये मोबाइल वापराला बंदी असली तरी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांकडील मोबाइलचा अधिक वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा नियंत्रणासाठी शिक्षण विभागाला सतर्क राहावे लागणार आहे. तसेच मोबाइलबंदी केवळ विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित राहता सुपरवायझर, प्राचार्य, केंद्रप्रमुख मदतनीस कर्मचाऱ्यांनाही करावी, अशी अपेक्षा प्रामाणिक विद्यार्थी पालकांकडून व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील केंद्रांकडे ओढा

बारावीच्या परीक्षेसाठी शहरापेक्षा ग्रामीण भागातील केंद्रांवर प्रवेश घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. गावाकडील केंद्रावरील परीक्षा नियंत्रक परिचयातील त्या ठिकाणी भरारी पथके पोहोचण्या आधीच त्याची माहिती मिळत असल्याने सर्व काही आलबेलची स्थिती दाखवली जाते. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील परीक्षार्थींच्या संख्येवरून हे दिसून येते. त्याचा परिणाम सकारात्मक निकालातून समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचा या केंद्रांकडील ओढा अधिक वाढला आहे.

मोबाइलबंदीच्या सर्वांनाच सूचना
^विद्यार्थ्यां बरोबरच केंद्रप्रमुख, शिक्षक त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाइलबंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरारी पथकांचाही त्यात समावेश असेल. ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियानात पालकांनीही सहभागी झाल्यास कॉपीचा प्रकारच संपेल. तसे आढळून आल्यास संबंधित शिक्षक वा कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल. शशिकांत हिंगोणेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी
परीक्षा नियंत्रकांकडूनच प्रोत्साहन
चार वर्षांपासून जिल्हा प्रशासन शिक्षण विभागाकडून ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियान राबवण्यात येत आहे. कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची केंद्राबाहेर झडती घेऊन परीक्षागृहात कॉपी नेण्यास मज्जाव केला जातो. मात्र, परीक्षा सुरू होताच परीक्षागृहात कॉपीला प्रोत्साहन दिले जाते. तसेच कॉपीस अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारा कर्मचारीवर्ग यातून सुटून विद्यार्थीवर्गाचेच शैक्षणिक नुकसान होते. मोबाइल व्हॉट्सअॅपचा उपयोग करून डीएड, टीईटीत परीक्षार्थींपर्यंत उत्तरपत्रिका पोहोचवल्याची अनेक उदाहरणे आहेत. सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमाचा उपयोग परीक्षांमध्ये होणे काळ्या दगडावरची रेघ बनली आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाइलवापराचे प्रमाण १० ते २० टक्के असले तरी, प्रश्नपत्रिकाफुटीमुळे उर्वरित ८० टक्के विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होण्याची भीती अधिक आहे.