आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजनाला चाैकाचाैकात दरवळला झेंडूंचा सुगंध; सकाळी 100 तर सायंकाळी 50 रुपये किलाे भाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दिवाळीच्या प्रकाश पर्वाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. दिवाळीत दुकाने, घरांना झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सजवले जाते. यामुळे झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी आहे. लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या फुलांना फार महत्व असल्याने शहरात चाैका चाैकात फुल विक्रेत्यांनी दुकाने थाटली हाेती. गुरूवारी झेंडूच्या फुलांचे दर ५० ते १०० रुपये किलाेपर्यंत होते. शहराच्या बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली असून आवक ही त्याप्रमाणात असल्याने फुलांचे भाव यंदा जनसामान्यांच्या आवाक्यात आहेत. 
 
सण आणि उत्सवांचा हंगाम सुरू झाला की सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळू लागतो. दीपोत्सवात विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाला शेवंती, झेंडू कमळ या फुलांना प्रचंड मागणी असते. गुरूवारी शिवाजी पुतळा, टॉवर चौक, गणेश कॉलनी, रिंग रोड शहराच्या उपनगरात झेंडूची फुले विक्रीसाठी आली आहेत. केशरी रंगाच्या झेंडूसाठी ५० ते ८० रूपये किलाे, तर पिवळ्या झेंडूच्या फुलांसाठी ५० ते १०० रुपये किलो विक्री झाली. व्यापारी, नागरिकांकडून लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना माेठी मागणी असल्याचे दिसून आले. 

फुलांबरोबरच तयार माळांनाही मागणी होत होती. बाजार समितीत पहाटे जिल्हाभरातून झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. गावराण झेंडू, कलकत्ता झेंडू या दोघांनाही समप्रमाणात मागणी होती. आंब्याची पाने देखील विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झालेली होती. सकाळच्या वेळी झेंडूंच्या फुलांचे भाव १०० रुपयांपर्यंत पोहचले होते; परंतु संध्याकाळपर्यंत हे भाव काही प्रमाणात खाली आले होते. फुलांसोबत तयार हार घेण्याकडेही नागरिकांचा कल आहे. लक्ष्मीपूजनासाठी शेवंती, कमळ तर दिवाळी पाडव्याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व असल्याने तिन्ही फुलांना चांगली मागणी आहे. दसऱ्याच्या तुलनेत फुलांच्या दरात माेठा फरक पडलेला नाही. 
 
कमळ फुलांना मागणी 
लक्ष्मीपूजनासाठी कमळाचे फूल शुभ मानले जाते. त्यामुळे कमळाच्या फुलांना देखील मागणी वाढली होती. यात पांढरे गुलाबी कमळ विक्रीस उपलब्ध होते. त्यातल्या त्यात गुलाबी कमळांना मोठ्याप्रमाणात मागणी होती. गुलाबी कमळ १० रुपये, तर पांढरे कमळ रुपयांना उपलब्ध होते. 
बातम्या आणखी आहेत...