आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेल्या साईच्या आठवणीने तुटतोय जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अडीच महिन्यांपासून घरात आलेल्या साईमुळे पाटील दांपत्याच्या घराला घरपण आले. त्याचे लडीवाळ हसणे, भूक लागल्यावर रडल्याने त्याला जवळ घेताना आईपणाचा अनुभव सर्व सुखांपुढे थिटा पडत असतानाच सोनल पाटील साई या माय-लेकराची दोन दिवसांपासून ताटातूट झाली आहे. त्याची काळजी कोण कशी घेत असेल, या चिंतेने तिचे काळीज तीळतीळ तुटत आहे. माझा साई मला हवा आहे, अशी आर्त हाक साद त्या आपल्या पतीला घालत आहेत.

अॅड. नथ्थू पाटील व सोनल पाटील या दांपत्याच्या माध्यमातून साई या अनाथ बालकाला माता-पित्याचे छत्र लाभले होते. गेल्या अडीच महिन्यांपासून साई आणि सोनल पाटील आई-मुलाचे ऋणानुबंध घट्ट झाले होते. त्यालाही नशिबाने मायेची ऊब मिळून आई-वडिलांचे छत्र लाभले होते. मात्र, समितीने बाळाला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याला जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डात झोळीत ठेवले आहे. त्याची निगा एक आयाघेत आहे. साई ताब्यात मिळावा, यासाठी पाटील दांपत्याने कायदेशीर कार्यवाहीची तयारी दर्शवली आहे. साईचा लळा लागल्याने तोच आम्हाला हवा आहे, याबाबत ते आग्रही आहेत. टाटिया शिशुगृहातून साईला दत्तक घेतल्यावर या शिशुगृह व्यवस्थापनाने त्यांना प्रक्रियेसंबंधी योग्य जाणीव करून दिली नाही. त्याचबरोबर संस्थेचे सचिव वीरेंद्र धोका यांनी एका दिवसात सर्व प्रक्रिया करून देण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनामुळे त्यांनी साईला दत्तक घेतले होते. अडीच महिने साईला वागवल्यानंतर सोनल पाटील यांचा तो काळजाचा तुकडा झाला आहे. मात्र, तो अचानक दुरावल्यामुळे त्या अतिशय खचल्या आहेत.

बाळाविषयी येत्या दाेन दिवसांत निर्णय घेणार
टाटियाशिशुगृहातून आतापर्यंत सर्व बालके ‘कारा’च्या नियमानुसार बाल कल्याण समितीने फ्री केल्यानंतरच दत्तक देण्यात आली आहेत काय, याबाबतही तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कायदेशीररीत्या बाळ दत्तक प्रक्रिया पूर्ण झालेली नसली तरी अडीच महिने साईला वागवल्यानंतर पाटील दांपत्याला त्याचा लळा लागलेला आहे. या बाळाविषयी दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती समितीच्या एका सदस्याने नाव सांगण्याच्या अटीवर दिली.
बातम्या आणखी आहेत...