आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचे वाहतूक नियंत्रणावर दुर्लक्ष; ‘टार्गेट’पूर्तीसाठी धडपड, शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महामार्गावर उभे असलेले वाहतूक पोलिस. - Divya Marathi
वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महामार्गावर उभे असलेले वाहतूक पोलिस.
जळगाव- शहरात बेशिस्त वाहतुकीने कळस गाठल्याने वाहतूक कोंडीत चांगलीच भर पडली आहे. मात्र, ज्यांच्यावर वाहतूक शिस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तेच वाहतूक पोलिस नियमांचा बागुलबुवा उभा करीत चौकाचौकात उभे राहून कारवाई वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दंडाच्या पावत्या फाडण्यात मग्न असतात. त्यामुळे वाहतूकीचा बाेजवारा उडत आहे. जळगाव बदलतेय, असे म्हणताना बेशिस्त वाहतूक मात्र बदलत नाही. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.
 
वाहन चालकांकडून नियम धाब्यावर :
वाहतुकीचे नियम न पाळणे, वाहतूक चिन्हांची माहिती नसणे, ड्रायव्हिंग क्षमता परिपूर्ण नसणे, वनवेमधून बेदरकारपणे वाहन चालवणे, कोणताही इशारा देता वाहन वळवणे, चुकीच्या मार्गाने ओव्हरटेक करणे आदी अनेक कारणांमुळे रस्ता सुरक्षा धोक्यात आली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, हेल्मेट घालणे, खराब रस्ते, चुकीचे गतिरोधक, चुकीचे वळण आदी विविध कारणांमुळेही रस्ता सुरक्षा धोक्यात आली आहे. 
 
नियम सांगणाऱ्यालाच ‘खडे बाेल’ 
शहरात वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला असताना त्यात बेशिस्त वाहनचालकांची अधिकच भर पडली आहे. कोणी वाहतूक नियम पाळले नाही तर सांगणाऱ्यालाच वाहनचालकांकडून ‘खडे बोल’ ऐकायला मिळत आहेत. ‘नियम आणि कायदा ठेवा बाजूला; असला नियम पाळत बसलो तर भारत कुठल्या कोठे गेला असता? मी काय पण करीन; तुम्हाला काय करायचेय? आता जाता की दाखवू तुम्हालाच कायदा?’ अशी वाक्ये ऐकू येतात. वाहतूक नियमांचे पालन करणे अनेकांना कमीपणाचे का वाटते? रहदारीच्या रस्त्यांवरील वाहतुकीत तुम्ही अडकला की, कोणतेही नियम, कोणताही कायदा तुम्हाला या कोंडीतून सोडवू शकत नाही. वनवेमधून बेदरकारपणे घुसणारी वाहने बिनदिक्कत पुढे जाताना दिसून येतात. सिग्नल असलेल्या चौकातील चारही दिशांच्या रस्त्यांवर किमान १०० मीटर अंतरापर्यंत दुचाकी असो वा चारचाकी वाहन पार्किंग करता येत नसल्याचा नियम आहे. मात्र, हा नियम शहरात सर्रास पायदळी तुडवला जात असल्याचे दिसून येते. 
 
मोहिमेपुरतीच पोलिसांची कारवाई 
केंद्र सरकारने यंदा ‘तुमची सुरक्षा म्हणजे कुटुंब सुरक्षा; सजग राहा’ असे घोषवाक्य रस्ता सुरक्षा अभियानासाठी दिले आहे. काही युवक बेदरकारपणे वेगाने वाहन चालवत असतात. अपघातास कारणीभूत घटकांची माहिती देऊन मोटार वाहन कायद्यानुसार स्थानिक पोलिस दल, वाहतूक शाखा यांचे आपापल्या परीने शहरात विविध चौकांत वेळोवेळी चेकिंग पॉइंट हाेत असतात. ही मोहीम संपली की, बेशिस्तीचे धडे वाहनचालकांकडून पुन्हा गिरवले जातात. 
 
सुरक्षित वाहतुकीबाबत प्रबोधन हवे 
‘आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित’ असे म्हटले जाते; पण रस्ते अपघातांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. जळगावातील रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या सुमारे ७५ टक्के लोकांचे वय १८ ते ३५ या वयोगटातील आहे. म्हणूनच रस्ता सुरक्षेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. अपघात होऊ नये म्हणून वाहतूक शाखेने विविध नियम बनवले आहेत. शहरात ठिकठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावलेले असतानाही दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास तेथेच लावली जातात. त्याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...