आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकले होताहेत कुत्र्यांचे टार्गेट, चार दिवसांत आठ जणांचे तोडले लचके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्लय़ात मोठी वाढ झाली आहे. त्यातही कुत्रे लहान मुलांवरच हल्ला चढवत असल्याच्या घटना जिल्ह्यात दररोजच घडत आहेत. महापालिकेचा कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठीचा ठेका कोणत्याही संस्थेने घेतलेला नाही. त्यामुळे नाइलाजाने मोकाट कुत्र्यांना शहराबाहेर निर्जन ठिकाणी सोडण्याची वेळ महापालिकेच्या आरोग्य विभागावर आली आहे. हे मोकाट कुत्रे शहराजवळील गावांमध्ये जाऊन लहान मुलांचे लचके तोडण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

चार दिवसांत आठ जणांचे तोडले लचके
गेल्या चार दिवसांत आठ चिमुकल्यांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. यात शनिवारी तुषार ज्ञानेश्वर धनगर (वय 5, रा. भादली), हर्षल कृष्णा जाखेटे (वय 14), प्रतीक शांताराम पाटील (वय 5), गायत्री हरी चौधरी (वय दीड वर्षे) सर्व रा. कुसुंबा, सोमवारी नेहा बापू वाडिले (वय 5, रा. एरंडोल), ओम ईश्वर पाटील (वय 5, रा. जळगाव) रामकृष्ण देवकर (वय 20, रा. जळगाव), सार्थक बाबुराव कांबळे (वय 3 रा. जळगाव) यांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

एकाला रेबीजची लागण
गेल्या महिन्यात 20 तारखेला जामनेर तालुक्यातील बेटावद येथील पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला होता. त्यापैकी शांताराम सीताराम ढोले (वय 50) यांना रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात अँण्टी रेबीजच्या 1 हजार 600 लसी उपलब्ध असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली.

अनेक दिवसांपासून निर्बिजीकरण नाही
महापालिकेतर्फे शहरातील मोकाट कुत्र्यांचे सामाजिक संघटनांकडून निर्बिजीकरण करण्यात येते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून एकही संस्था हे काम करण्यासाठी पुढे आलेली नसल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सोडण्यात येते. हे कुत्रे आजूबाजूच्या गावांमध्ये घुसून हल्ले चढवत असल्याचा आरोप जखमी मुलांच्या पालकांनी केला आहे.
स्वसंरक्षणाचे उपाय
शक्यतोवर लहान मुलांना खाद्यपदार्थ, दूध घेण्यासाठी दुकानावर एकट्याने पाठवू नये.
रात्रीच्यावेळी रस्त्यावर कुत्री उभी असतात, अशावेळी मुळातच वाहनाचा वेग कमी करावा.
कुत्री मागे येत असतील तर वाहन थांबवावे. त्यांना टाळण्यासाठी स्पीड वाढवणे चुकीचे आहे.
आपण पायी चालत असल्यासही धावू नये.
कुत्र्यांना डिवचू नये.

बाहेरून आलेल्या कुत्र्यांचा हैदोस
आमच्या गावात या पूर्वी एवढे कुत्रे नव्हते. अचानक त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बाहेरून कोणीतरी हे कुत्रे सोडत आहे. त्यांचा त्रास नाहक आम्हाला सहन करावा लागत आहे. कृष्णा जाखेटे, जखमी हर्षलचे वडील
कायद्यातील अडचणी
पेटा कायद्यांतर्गत कुत्र्यांना मारण्याला बंदी आहे. अगदी पिसाळलेल्या कुत्र्यांनाही मारण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना शहराबाहेर निर्जन ठिकाणी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. डॉ. विकास पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा
हे करू नका
  1. जखमेवर पट्टी/ बॅँडेज बांधू नका व टाके घालू नका.
  2. कोणत्याही प्रकारची औषधे उदा. झाडपाल्यांचे रस, कॉफी पावडर, शेण, मिरची पावडर, अँसिडस्, अल्कलीज, हळद पावडर, चुना, तंबाखू लावू नका.
  3. जखमेला गरम सळईचा डागही देऊ नका.
श्वान दंशावर हे करा
  • चावल्यामुळे झालेली जखम साबण आणि भरपूर पाण्याने धुवा.
  • जखम धुतल्यानंतर त्यावर निर्जंतूक करण्याची औषधी लावा.
  • तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून लस टोचून घ्या.