आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Illegal Abortion Issue At Nandurbar Two Doctor Aressted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदुरबारमध्ये पर्दाफाश; लिंगनिदान करणार्‍या सुरतच्या डॉक्टरांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- नंदुरबार येथील एका दलालासह सुरत येथील दोन डॉक्टरांना गर्भलिंगनिदान करताना गुजरातेतील सुरतमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले असून आणखी एका दलालाचा शोध सुरू आहे. स्त्री भ्रूणहत्येसाठी काम करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. महाराष्ट्रातील पथकाने गुजरातमध्ये जाऊन शनिवारी ही कारवाई केली.

गुजरात हद्दीजवळ असलेल्या नंदुरबार जिल्हय़ातून गर्भवती महिलांना सुरतला पाठवून गर्भलिंगनिदान करवून घेणारी आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भपातही करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती या संदर्भात कार्य करणार्‍या
सामाजिक संस्थांना होती.

असे घडले ‘ऑपरेशन पर्दाफाश’
या स्टिंग ऑपरेशनसाठी तयार करण्यात आलेली टीम 21 मार्च रोजी शहाद्यातील ‘खुशी हॉस्पिटल’मध्ये एका गर्भवती महिलेसह गेली. तिथे गर्भलिंगनिदानाच्या बाबतीत विचारणा करण्यात आली. वॉर्डबॉय हरिलाल पवार याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र ‘या कामी तुम्हाला अप्पा मदत करेल’ असे सांगितले. अप्पाशी मोबाइलने संवाद साधला असता 50 हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले. ही रक्कम मोठी वाटल्याने हरिलाल पवारने स्वत:च सुरतला नेऊन काम करून देण्याचे आश्वासन दिले.

23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुरतकडे टीम निघाली. तिथे पोहोचण्यापूर्वी गर्भलिंगनिदानासाठी देण्यात येणार्‍या नोटांचे क्रमांक जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नोंद करण्यात आले होते. गुजरातच्या प्रशासकीय यंत्रणेला याबाबत कळवण्यात आले होते. दलाल पवारने सुरतमधील डॉ. चेतन पटेल यांच्या क्लिनिकमध्ये या गरोदर महिलेला नेले. त्यानुसार डॉ. केतन जरीवाला यांच्या वाणी हॉस्पिटलमध्ये टीम पोहोचली. 14 हजार रुपये शुल्कही ठरले. निदान झाल्यानंतर त्या गरोदर महिलेला मुलगी असल्याचा अहवाल देण्यात आला. गर्भ अधिक दिवसांचा असल्याने गर्भपात करू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

पहिलेच स्टिंग
आंतरराज्य स्तरावरील अशा पद्धतीचे हे पहिलेच स्टिंग ऑपरेशन असून शहाद्यातील दुसरा दलाल अप्पाचा शोध घेतला जात आहे. खुशी हॉस्पिटलचे डॉ. सैंदाणे यांच्यावर अद्याप कुठलाही ठपका ठेवण्यात आला नसला तरी त्यांनाही याबाबतीत जाब द्यावा लागेल, असे सांगण्यात आले.