आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारूविक्री विरोधात नारीशक्ती एकवटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव- गावातील अवैध दारूविक्री आणि अमली पदार्थांची विक्री रोखण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आल्याने संतप्त झालेल्या अंजनसोंडे (ता.भुसावळ) येथील महिलांनी, सोमवारी सायंकाळी वरणगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. महिलांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच ठाण मांडून अधिकार्‍यांना जाब विचारला.

वरणगाव परिसरात सध्या चोरीच्या घटनांसह अवैध व्यवसायांना ऊत आला आहे. वरणगावातील चोरीच्या घटना रोखण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चोरीच्या अनेक घटना घडूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिस प्रशासनाने तत्परता दाखवलेली नाही. या प्रकारामुळेच परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. अंजनसोंडे गावाबाहेरील बिअर शॉपी व दारूविक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांसह ग्रामस्थांनी, वरणगाव पोलिसांना 10 डिसेंबरला अर्ज दिला होता.

मात्र, दीड महिन्याचा कालावधी उलटूनही पोलिसांनी तक्रार अर्जाची दखल घेत कोणतीही कार्यवाही केली नाही. या मुळे गावातील महिलांनी सोमवारी सायंकाळी वरणगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या प्रकारामुळे वरणगाव पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. पोलिस प्रशासनासोबत ग्रामपंचायतीनेही अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चेदरम्यान व्यक्त केली. संबंधित दुकानदाराला पोलिसांनी समज दिल्यानंतर आंदोलक नरमले. आंदोलकांमध्ये अंजनसोंडे गावातील महिलांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला होता.

संबंधित दुकानदाराला समज देण्यात आली आहे. आक्षेपार्ह वस्तूची विक्री होत असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. दत्तात्रय परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक, वरणगाव

मुद्दा गाजणार
प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत गावातील बिअर शॉपीचा मुद्दा गाजला. या विरोधात ग्रामसभेने ठराव संमत केला. मात्र, कोरम पूर्ण न झाल्याने ठराव पारित झाला नाही. त्यामुळे पुढील ग्रामसभेत पुन्हा हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.