आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात धडक कारवाई: समतानगरात काढले विजेचे 400 आकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मोठय़ा प्रमाणात वीजचोरी होत असलेल्या समतानगर भागातून क्रॉम्प्टनने गुरुवारी 400 आकडे काढून वीजचोरी रोखली. पोलिस प्रशासनाकडून पुरेशी कुमक मिळाल्याने क्रॉम्प्टनने ही मोहीम राबवली. आकडे काढून तत्काळ वीजमीटर देण्याचे कामही कंपनीने केले. त्यामुळे नागरिकांकडूनही या मोहिमेला फारसा विरोध झाला नाही. आकडे काढलेल्या वीजवाहिनीवर इन्सुलेटेड आर्मेड केबल टाकून काही भाग आकडेमुक्त केला आहे.

समतानगरात मोठय़ा प्रमाणात वीजचोरी होते. याची गांभीर्याने दखल घेऊन क्रॉम्प्टनने तब्बल पाच तासांमध्ये 400हून अधिक अनधिकृत कनेक्शन काढले. याबाबत कंपनीने पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याकडे कारवाईस सहकार्य करण्याची मागणी केली होती. त्यामुळे अधीक्षकांनी वीजचोरी रोखण्यासाठी पोलिस कुमक पुरवली. यावेळी युनिट हेड डॉ.व्ही.पी.सोनवणे यांच्यासह शहर अभियंता मुकेश चौधरी, चेतन मेहता, संदीप बडगुजर, एस.के.पाटील उपस्थित होते. या वेळी रामानंदनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश मोरे यांनी बंदोबस्त चोख ठेवला. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, आठवडाभरात जैनाबाद, सुप्रीम कॉलनी, राजा पार्क, गेंदालाल मिल भागातही राबवली जाणार आहे.

ऑन दी स्पॉट मीटर
समतानगरात कर्मचारी सकाळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वीजपुरवठा खंडीत केला. त्यानंतर खांबावरून पसलेले वायरिंगचे जाळे काही वेळातच काढले. तसेच आर्मेड केबल वायर टाकली. त्यामुळे आता चोरीचा मार्ग कायमचा बंद झाला आहे. तक्रार करणार्‍या आकडेधारकांना तत्काळ मीटरचा पर्यायही कंपनीने उपलब्ध ठेवला होता. त्यानुसार मीटरसाठी अर्ज व नाममात्र पैसे भरून तात्काळ वीजमीटरही दिले गेले. यासह आकडे काढलेल्या आकडेधारकांना अंधारात न ठेवता, त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करून देवून त्यांना वीजमीटर घेण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली.