आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्याजवळ 42 लाखांचे मद्य जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - थर्टीफर्स्टसाठी मुंबईच्या काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा तब्बल 42 लाखांच्या मद्यासह 60 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यर्शी जाधव यांनी धुळयाजवळ जप्त केला. हरियाणामधून चोरट्या मार्गाने ही दारू विक्रीसाठी नेली जात होती. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांतील या विभागाची ही सहावी ‘जंबो’ कारवाई आहे.

गेल्या वर्षभरापासून अनेक कारवायांमुळे चर्चेत आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यर्शी जाधव यांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर गस्त वाढविली होती. धुळेमार्गे मुंबईला निघालेल्या कंटेनर (एम.पी.09/के.सी.9343)मधून मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पुरमेपाडा शिवारातील बोरी नदीच्या पुलावर हा कंटेनर अडवण्यात आला. या वेळी वाहनचालक ओंकारसिंग केनॅलसिंग जाट (45, रा. गुरुदासपूर, पंजाब) याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा मद्यसाठा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या वाहनातून 884 बॉक्समधील सुमारे 12 कंपन्यांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत 41 हजार 75 हजार 184 रुपये तर वाहनाची किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे. याशिवाय चालक ओंकारसिंग याच्याकडून एक हजार 220 रुपये जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे 59 लाख 76 हजार 404 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यर्शी जाधव, निरीक्षक आर. एस.सोनवणे, प्रवीण सोनवणे, दुय्यम निरीक्षक एस.टी. भामरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी चालक ओंकारसिंग जाट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट पावतीचा आधार
चालक ओंकारसिंग याच्याकडे एक बनावट पावती मिळून आली. या पावतीद्वारे या कंटेनरमधून एका कंपनीच्या उत्पादनाची वाहतूक होत असल्याचे भासवून चालकाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अखेर वाहनाच्या झडतीत त्याचे पितळ उघडे पडले.

थर्टीफर्स्टचा बंदोबस्त
राज्याच्या सीमावर्ती भागातून दरवर्षी मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर मद्यसाठा राज्यात येतो. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात जातो. विशेषत: मध्य प्रदेशच्या सीमेलगत हा प्रकार मोठया प्रमाणात दिसून येतो. याशिवाय एक निरीक्षक व दोन उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी सहकार्‍यांसह या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.