आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात पेट्रोलचा होतोय बिनधास्त काळाबाजार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या टँकरचालकांनी पुकारलेल्या संपामुळे हिंदुस्थान कॉर्पोरेशनच्या पंपांवर कमालीची गर्दी उसळत आहे. काही पंपांवर ड्रम आणि बाटल्या घेऊन लोक पेट्रोल देण्यासाठी आग्रह करत आहे. काही खरोखर गरजू आहेत तर काही ड्रम आणि बाटलीत पेट्रोल घेऊन रस्त्यात बंद पडलेल्या वाहनधारकांना 100 रुपये लिटरने काळयाबाजारात विक्री करत आहेत. काळयाबाजारात पेट्रोलची विक्री करता यावी आणि पेट्रोल ड्रम किंवा बाटलीत मिळावे म्हणून पंपांवरील कर्मचार्‍यांना दमदाटीचे प्रकार घडत आहेत. भानगड नको म्हणून अनेकांनी काही काळ पंपच बंद केले होते.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या टॅँकर्सचालकांना 1.60 रुपये प्रति किलोमीटरला दर दिला जात आहे. तर हिन्दुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनी 2.12 रुपये किलोमीटरमागे दर देते. वास्तविक पेट्रोल भाववाढ, कर, सवलती आणि लाभ सर्वच कंपन्यांना शासन समान देते मग सर्व कंपन्यांनी समान पद्धतीनेच वाहतूक दर टॅँकर्सचालकांना दिले पाहिजे. एकाच ठिकाणाहून इंधन वाहतूक करणार्‍या टँकर्सचालकांना वाहतुकीचे दर देताना तफावत दिसून येत आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांप्रमाणे भारत पेट्रोलियमच्या टॅँकर्सचालकांनीही दरवाढ मागितली आहे. तथापि, कंपनीने अद्याप अपेक्षित दरवाढ न केल्याने मनमाडजवळील पानेवाडी येथून गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल शहरात येत नाही. त्यामुळे सर्वच वाहनधारकांची हिन्दुस्थान कॉर्पोरेशनच्या पंपांवर गर्दी होत आहे. दरम्यान, ज्या पंपधारकांचे स्वत:च्या मालकीचे टॅँकर होते ते पेट्रोल आणत होते. मात्र, त्यांनाही पुरेसा कोटा आणणे शक्य होत नाही. पेट्रोलअभावी शहरातील अनेक पंप बंद आहेत. जिथे पेट्रोल उपलब्ध आहे, त्या पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. वाहनधारक मिळेल तेथून आता पेट्रोल घेत आहेत. पंधरा दिवसांपासून शहरात पेट्रोलची टंचाई सुरू असल्याने अनेकजण अधिकचे पेट्रोल वाहनात भरून त्याचा साठा करीत आहे. सद्य:स्थितीत पेट्रोल मिळेनासे झाल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. पेट्रोल नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पेट्रोलची तीव्र टंचाई जाणवत असल्याने त्याचा काळाबाजार होऊ लागला आहे. संप अद्यापही मिटलेला नाही. पंधरा दिवस उलटूनही प्रशासनाने त्यावर कोणतेही पाऊल उचललेले नाही. अजून काही दिवस संप असाच सुरू राहिल्यास उद्रेक होण्याची शक्यता आहे. पेट्रोल उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शहरात रिक्षांव्यतिरिक्त वाहतुकीसाठी दुसरे सार्वजनिक वाहन नाही. यातून मोठी तारांबळ उडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बंदोबस्तात पेट्रोल वितरित करण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.


महामार्गावरही गर्दी
मुंबई-आग्रा महामार्गावर पंपांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरातील नागरिक पेट्रोल घेण्यासाठी महामार्गावर येत आहेत. तेथे काळाबाजार करणारे बाटल्या, ड्रम घेऊन येत आहेत. पेट्रोल मिळावे म्हणून आग्रह धरतात. पेट्रोल न दिल्यास वादावादीच्या घटना घडतात. दुपारी श्रीराम पेट्रोल पंपावर वाद झाल्यानंतर तो पंप काही काळ बंद होता. त्यानंतर अनेकजण महामार्गावरील सुभाषचंद्र पंपावर आले, तेथील कर्मचार्‍यांनी बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे वाद होण्याची शक्यता वाढली होती. तथापि, मध्यस्थीने वाद मिटला.