आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - तालुक्यात गौणखनिज तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. महसूल, राजकारणातील काही धेंडांना हाताशी धरून तस्करांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहे. मात्र, हा प्रकार असह्य झाल्याने तालुक्यातील साकरी येथील इंदिरानगरवासीयांच्या संतापाचा उद्रेक झाला. शनिवारी त्यांनी आठ डंपर अडवले. यापैकी मुरूम असलेल्या तीन डंपरला सर्कलने दंड ठोठावला.
किन्ही एमआयडीसीमधून गौणखनिजाची बिनबोभाट वाहतूक सुरू आहे. दहा डंपरच्या माध्यमातून दररोज ही वाहतूक होते. किन्ही-साकरी रोडवरील साकरीतील इंदिरानगरातून साकरी फाटामार्गे पुढे ही वाहतूक होते. दिवसाढवळ्या चालणार्या या प्रकाराबाबत महसूल विभागाला काहीही देणे-घेणे नाही. क्षमतेपेक्षा जास्त भरल्या जाणार्या डंपरमधून गौणखनिज रहदारीच्या रस्त्यावर पडते. यामुळे वाहने घसरून अपघात होतात. शिवाय अवजड डंपरच्या धडकेमुळे शाळा, अंगणवाडीत जाणार्या इंदिरानगरातील मुलांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. ‘कमी वेगाने डंपर चालवा, गौणखनिज रस्त्यावर पडणार नाही याची दक्षता घ्या,’ ही विनंती करूनही उपयोग न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी आठ वाहने अडवली. यापैकी तिघांमध्ये मुरूम भरलेला होता. तहसीलदारांच्या सूचनेवरून सर्कलने डंपरवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, ग्रामस्थांचा रोष कायम असून हा प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे.
पोखरणे सुरूच
गौणखनिज तस्करांनी यापूर्वी तालुक्यातील साकेगाव शिवारात वाघूर नदीचे पात्र पोखरले आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला हा प्रकार वर्षानुवर्षे कायम आहे. मात्र, आर्थिक वर्षाच्या शेवटी उद्दिष्टपूर्तीच्या देखाव्यासाठी झटणारे अधिकारी-कर्मचारी एरवी नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होत असताना डोळ्यावर कातडी पांघरतात. यामुळे तस्करांनी वाघूरच्या छातडावर ठिकठिकाणी सुरूंग लावणे सुरूच ठेवले आहे. शनिवारी साकरीमधील ग्रामस्थांनी आठ डंपर पकडले. यापैकी तीन डंपरमध्ये मुरूम भरलेला होता. ही वाहने सोडवण्यासाठी राजकीय क्षेत्रात कार्यरत काही मंडळींनी पडद्याआडून हालचाली केल्या. मात्र, नागरिकांच्या मागणीमुळे दंडात्मक कारवाई करणे भाग पडले.
दंड घेतला
नागरिकांनी गौणखनिज वाहतूक करणारे डंपर पकडताच घटनास्थळ गाठले. तीन डंपरमध्ये मुरूम भरला होता. त्यांच्याकडे परवाना नसल्याने प्रत्येकाकडून पाच हजार रुपये दंड वसूल करून वाहने सोडली. डी.एल.मारकड, प्रभारी सर्कल, पिंपळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.