आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफियांवर एमपीडीए दूरच, गुन्हेही दाखल होईना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अवैध वाळू वाहतुकीचे वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले आहेत. बंदी असतानाही शहरात अवैध वाळू वाहतूक सुसाट सुरू आहे, अशा परिस्थितीत महसूल पोलिस यंत्रणा वाळूमाफियांवर साधे गुन्हेही दाखल करत नसून एमपीडीएची कारवाई तर दूरचीच गाेष्ट आहे. त्यामुळे वारंवार दाद मागूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अवैध वाळू वाहतुकीविरोधात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. गुरुवारी समता नगरात वाळूच्या ट्रॅक्टरने एका युवकाला धडक दिली होती.
बंदी असतानाही शहरातून सुसाटपणे अवैध वाळू वाहतूक केली जात आहे. वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक भरधाव वाहन चालवत असल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे; अशा परिस्थितीतही महसूल पाेलिस यंत्रणा कारवाई करत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत आहे. वारंवार दाद मागूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक अवैध वाहतुकीविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात नागरिकांनी सावखेडा गावाजवळ गिरणा नदीपात्रात अवैध उत्खनन करून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांना पकडून दिले होते. तरीदेखील काहीच झाले नाही.

अवैधवाळू वाहतूक सुसाट
महसूल मंत्री खडसे यांनी वारंवार अवैध वाळू वाहतुकीबाबत गुन्हे दाखल झालेल्यांवर एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, महसूल पोलिस प्रशासनाच्या नजरेसमोरून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू असते. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे िदसून येते. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत. त्यातच अवैध वाळू वाहतुकीला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप पोलिस यंत्रणा करीत आहे. त्यामुळेही मर्यादा येत असल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे, अशा परिस्थितीत गुन्हेच दाखल होत नसल्याने "एमपीडीए'ची कारवाई फारच दूर राहिली आहे.

पोलिसांनी वाळूचे ट्रॅक्टर घेतले ताब्यात
रामानंदनगर पोलिसांनी विनाक्रमांकाचे वाळू भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. सद्य:स्थितीत ट्रॅक्टर रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टरमालक सचिन यशवंत पाटील (रा.वैजनाथ, ता.एरंडोल) हे शहर पोलिस ठाण्यात हजर झाले हाेते. पोलिसांनी ट्रॅक्टरचा अहवाल तयार करून तहसीलदार गोविंद शिंदे यांच्याकडे पाठवला आहे.
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर नागरिकांनी अडवले

शिवाजीनगरात नागरिकांनी बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर अडवला होता. त्यामुळे परिसरात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. तसेच गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास विनाक्रमांकाच्या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने समतानगरातील संत गाडगेबाबा चौकात अजय बिऱ्हाडे नावाच्या युवकाला धडक दिली. या अपघातात बिऱ्हाडे जखमी झाला होता. अपघातानंतर येथे समतानगरातील ४० ते ५० नागरिकांनी ट्रॅक्टर अडवले; तर ट्रॅक्टरचालक फरार झाल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. ही माहिती कळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते.
समतानगरात याच विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने युवकाला धडक दिली होती.