आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरात लवकरच टपरी हटाव मोहीम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- महापालिकेच्या वसुली विभागातर्फे शहरातील टपरीधारकांचा सव्र्हे करण्यात आला आहे. टपरीधारकांना आता दरमहा फी भरावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना महापालिकेत नोंद करणे आवश्यक आहे. ज्यांनी अद्याप नोंद केलेली नाही अशा टपरीधारकांवर लवकरच कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहे.

शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. त्यांच्यासाठी शहरात हॉकर्स झोन तयार करण्यात यावे यासाठी महापालिकेतर्फे उपविधी तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फेरीवाल्यांकडून रोज बाजार फी वसूल करण्यात येत आहे. बाजार फी वसुलीसाठी अद्याप ठेका देण्यात आलेला नाही. महापालिकेचे वसुली विभागातील कर्मचारी सध्या ती वसूल करीत आहेत. तसेच शहरात मोठय़ा प्रमाणात टपरीधारक आहेत. शहरातील विविध भागात टपरी थाटून व्यवसाय करीत आहे. अशा टपरीधारकांकडूनही बाजार फी वसूल केली जात आहे. रोज 10 रुपयांप्रमाणे फी वसूल केली जात आहे. मात्र, या टपरीधारकांकडून रोजच्या ऐवजी दर महिन्याला बाजार फी वसूल करण्यात येणार आहे. शहरातील टपरीधारकांचा सव्र्हे करण्यात आला. त्यानुसार 1250 टपरीधारक शहरात आहेत. त्या सर्वांना महापालिकेत नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. महापालिकेत नोंदणीची मुदत वाढवून दि.15 जानेवारीपर्यंत करण्यात आली होती. मात्र या मुदतीत केवळ शंभर टपरीधारकांनी येथे नोंद केली आहे. महापालिकेतर्फे टपरीधारकांना एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे परवाने देण्यात येणार आहेत. मात्र टपरीधारकांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. नोंदणीला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. निम्मेदेखील नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता ज्या टपरीधारकांनी नोंदणी केलेली नाही. त्यांच्यावर महापालिका कारवाई करणार आहे. महापालिकेच्या वसुली विभागातर्फे ही कारवाई होणार आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात शहरात दंगल भडकल्याने तूर्त ही कारवाई लांबणीवर पडली होती. कारण कारवाईसाठी पोलिस संरक्षण लागणार होते. पोलिस दंगलीच्या बंदोबस्तावर असल्याने कारवाई लांबत आहे. पोलिस संरक्षण उपलब्ध होताच टपरीधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील फिरत्या व्यावसायिकांचाही प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. शहरात हॉकर्स झोन झाल्यावर रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार असून रस्ते मोकळे श्वास घेतील.

मनपाच्या सभेत आज विविध विषयांवर चर्चा
महापालिकेच्या उद्या मंगळवारी होणार्‍या महासभेत 26 विषय चर्चेला ठेवण्यात आले आहेत. या विषयांत शहरातील मालमत्ता करात सूट देणे तसेच थकबाकी एकरकमी भरल्यास सूट देणे या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

विविध महापुरुषांची प्रतिमा सभागृहात लावण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. पीसीपीएनडीटी व एसटीपी कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचनेनुसार स्त्री-भ्रूणहत्या हा कायमस्वरूपी विषय महासभेत ठेवण्याबाबत कळविले आहे. त्याबाबत महापालिकेतर्फे करण्यात आलेली कार्यवाही माहितीसाठी सादर करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय फे रीवाला धोरण राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या धोरणाच्या अनुषंगाने धुळे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाला व्यवसायाचे आदर्श उपविधीस मान्यता देण्याबाबत आलेल्या कार्यालयीन निवेदनावर चर्चा होणार आहे. मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम बिल मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत भरल्यास करावर दोन टक्के सूट देणे, महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी कृमी मिर्शखत व सौरऊज्रेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टर आणि इतर अपारंपरिक ऊर्जास्रोत, वृक्षसंवर्धन पद्धत अवलंबल्यास मालमत्ता करातून सूट देण्यावर विचार करणे आदी विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत.

विरोधी पक्षनेतेपदी भगवान गवळी
महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी सोमवारी शिवसेनेचे भगवान गवळी यांची निवड करण्यात आली. तसे पत्र महापौर मंजुळा गावित यांना शिवसेना गटनेते नरेंद्र परदेशी यांनी दिले.

महापालिकेच्या विरोधी बाकावर शिवसेना आहे. शिवसेनेचे 17 नगरसेवक आणि एक स्वीकृत असे 18 नगरसेवक आहेत. विरोधी पक्षातील मोठा गट म्हणून शिवसेना आहे. महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने पक्षादेशाप्रमाणे नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक भगवान गवळी यांचे नाव यासाठी पुढे आले. यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास अवचट यांच्या मार्गदर्शनानुसार गटनेते नरेंद्र परदेशी यांनी महापौर मंजुळा गावित यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी भगवान गवळी यांची निवड केल्याचे पत्र दिले. त्याप्रमाणे सोमवारी विरोधी पक्षनेते पदाचा पदभार भगवान गवळी यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वीकारला. विरोधी पक्षनेत्याची घोषणा होताच महापालिका आवारात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. तसेच ढोलताशे आणि डीजेच्या गजरात भगवान गवळी यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अतुल सोनवणे, हिलाल माळी, नरेंद्र परदेशी, राजेंद्र पाटील, प्रदीप कर्पे, रमेश र्शीखंडे, महेश मिस्त्री, रवींद्र काकड, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भगवान गवळी यांना यानिमित्त पक्षाने दिलेली ही संधी आहे. आगामी काळात पक्षाच्या धोरणानुसार काम करावे आणि विकासकामासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.