आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ स्थानकावर अनधिकृत स्टॉल्स्; बनावट ओळखपत्रांचा वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ रेल्वे जंक्शन स्थानकावरील बालन नॅचरल फुडस् प्रा.लिमिटेडच्या 10 स्टॉल्स्वर 10 मेपासून भूमिका एजन्सीला अधिकृत फ्रॅँचायझी देण्यात आली आहे. मात्र, पूर्वीच्या अनधिकृत स्टॉल मालकांनी ताबा सोडलेला नाही. बनावट ओळखपत्र तयार करून स्थानकावर अनधिकृतपणे खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार बालनचे अधिकृत मालक हक्कदार दिनेश लखोटे यांनी लोहमार्ग पोलिसांकडे केली आहे.


बालन कंपनीच्या स्टॉल्स्वरील वेंडरांकडे कंपनीचे अधिकृत व्यक्ती म्हणून विजय मौर्य किंवा दिनेश लखोटे यांची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र, स्टॉल्स्वर बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले आहे. ठेकेदारांच्या नावे सय्यद हमीद सय्यद कासम आणि राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षर्‍या कार्डवर आहेत. विशेष म्हणजे बालन कंपनीने या दोघांनाही दिलेली फ्रॅँचायझी बंद करून 10 मे 2012 पासून ती भूमिका एजन्सीच्या नावे दिली आहे. मात्र, या प्रकरणी बालन कंपनी आणि संबंधितांचा न्यायालयात खटला सुरू आहे. सिनिअर डीसीएम एन. जी.बोरीकर यांच्या कृपाशिर्वादाने स्टॉलवर अनधिकृत पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. स्थानकावरील नऊ स्टॉल्स्वर बेकायदेशीर खाद्यपदार्थ अनधिकृत वेंडर्सद्वारे विकले जात आहे. अधिकृत स्टॉल्स्ची परवानगी नसतानाही खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. भुसावळ स्टेशन परिसरात बालन नॅचरलच्या ओळखपत्रावर विजय मौर्या किंवा दिनेश लखोटे यांचे हस्ताक्षर असलेले ओळखपत्र नसल्यास कारवाई करावी, असेही लखोटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 10 मे 2012 पासून फ्रॅँचायझी बदलल्याचा प्रकार रेल्वेतील वरिष्ठ अधिकार्‍यांना माहित असतानाही अनधिकृत व्यक्ती स्टॉल चालविणार्‍यांना अभय कुणाचे? असा प्रश्न आहे. रेल्वे प्रवासात विषबाधा होऊन एका बालकाचा बळी गेल्याची घटना ताजी आहे. मात्र, तरीही या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.

अधिकृत पदार्थही नाही
स्थानकावर रविवारी गेलो होतो. फलाट चार व सहावरील बी 4 या बालनच्या मालकीच्या स्टॉलवर बालनचे अधिकृत खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले नसल्याचे आढळले, असे लखोटे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

रेल्वे कारवाई करणार
रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांकडून रेल्वे फी वसूल करीत असते. जे स्टॉल बडतर्फ केले आहे त्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. रेल्वेतर्फे लवकरच कारवाई केली जाईल.
-बी.पी. पांडे, मंडळ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

स्टॉल्स्चा ताबा द्या
रेल्वेस्थानकावर सिनिअर डीसीएम एन.जी. बोरीकर यांच्या आशिर्वादामुळे अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रे त्यांचे फावले आहे. अधिकृत असतानाही आपणास स्टॉलचा ताबा दिला जात नाही. गुंडप्रवृत्तीच्या लोकांना मात्र रान मोकळे आहे. अन्नातून विषबाधेचा प्रकार घडत असतानाही रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
-दिनेश लखोटे, संचालक, भूमिका एजन्सी