जळगाव- प्रचारसभांमुळे निवडणुकीचे वातावरण तापत असताना जळगावात चौरंगी लढतीचा फायदा घेत सट्टाबाजार तेजीत आला आहे. जळगाव शहर मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश जैन यांचाच सट्टाबाजारात सध्या बोलबाला दिसून येत आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरेश भोळे तर तिसऱ्या स्थानावर ललित कोल्हे आहेत.
मतदानाला अद्याप नऊ दिवसांचा अवधी बाकी आहे. शनिवार, रविवारपर्यंत सट्टाबाजारात आमदार सुरेश जैन यांचे नाव अग्रस्थानी आहे. शहरात अद्याप अनेक दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. एकंदरीत वातावरण निर्मितीला वेळ असतानाच सट्टाबाजार तेजीत आला आहे. घरकुलाच्या आरोपाखाली कारागृहात असतानाही जैन यांच्याच विजयाची खात्री सट्टाबाजांना वाटत आहे. मोदींची जादू चालल्यास भाजपचे उमेदवार भोळे बाजी मारू शकतात, असे वाटत असल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राज ठाकरे यांची एकही सभा जळगावात नसली तरी मनसेचे ललित कोल्हे तिसऱ्या क्रमांकावर असून राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज चौधरी चौथ्या क्रमांकावर आहेत.
काँग्रेससह इतर बेदखल
सट्टेबाजारातून समोर येत असलेल्या इतर उमेदवारांच्या दरांमध्ये जामनेरातील भाजपचे उमेदवार गिरीश महाजन यांचा दर ६० पैसे आहे. तसेच जळगाव शहर मतदारसंघातील कॉंग्रेसचे डॉ.राधेश्याम चौधरी, बहुजन समाज पार्टीचे सय्यद नजीर महंमद, समाजवादी पार्टीचे इब्राहिम मुसा पटेल, अखिल भारत हिंदू सभेचे विशाल शर्मा, राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे राजेश सोनवणे यांच्यासह अपक्ष उमेदवारांची मात्र सट्टे बाजाराने अद्याप दखल घेतलेली नाही.
असे असते गणित
एका उमेदवाराचा दर १० पैसे निघाल्यास १०० रुपये लावल्यावर संबंधित उमेदवार निवडून आल्यास परतावा म्हणून ११० रुपये मिळतात. उमेदवाराची दररोजची स्थिती पाहून दर बदलत असतात. एखाद्या उमेदवाराचा दर आज अधिक असला तरी तो निवडून येण्याची शक्यता वाढल्यास त्याचा दर कमी होतो. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता जास्त त्याचा दर सट्टे बाजारात कमी, असे समीकरण असते.
विधानसभेसाठी शहरातील बुकी सक्रिय झाले आहेत. स्थानिक पातळीवरील विधानसभेची गणिते वेगवेगळी असल्याने हे बुकी स्वत:च धोका पत्करत आहेत. निवडणूक काळात घरोघरी जाणाऱ्या पैशाला अटकाव करण्यापेक्षा बुकींपर्यंत जाणाऱ्या पैशाला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे.
असे आहेत दर
३५ पैसे, आमदार सुरेश जैन (शिवसेना)
४५ पैसे, सुरेश भोळे (भाजप)
९० पैसे, ललित कोल्हे (मनसे)
०१ रुपया १५ पैसे, मनोज चौधरी (राष्ट्रवादी)