आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद दुकानांमधून घेतलेल्या मद्याच्या बाटल्या उघडतात टपऱ्यांच्या अाड, पाेलिस प्रशासनाचेही दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पानटपरीवर खरेतर पानसुपारी अथवा गुटखा घ्यायला ग्राहक जातात. मात्र, सध्या शहरातील बहुतांश टपऱ्यांवर मद्यशाैकिनांची गर्दी अाढळून येते. सुटाबुटातील व्यक्तीही मद्य प्राशनासाठी थेट टपऱ्यांचा अाधार घेताना दिसतात. ‘दिव्य मराठी’ने रविवारी केलेल्या एका ‘स्टिंग’मध्ये उघड्यावर मद्य पिण्याचा प्रकार खुलेअाम अाढळून अाला. सुटाबुटातील व्यक्ती टपरीवर अाली. टपरीतून ग्लास घेतला. त्यानंतर पाण्याचा पाऊचही घेतला. खिशातून मद्याची बाटली काढली. खुलेअाम ही बाटली उघडली. साेबत टपरीवरीलच चिप्स घेतले अन् अापला मद्यप्राशनाचा कार्यक्रम पूर्ण केला. ही सगळी चित्रे कॅमेराबद्ध झाली. पण काेणालाही त्याची फिकीर नाही, असेच दिसून अाले.
 
शहरातून जाणाऱ्या दाेन महामार्गांमुळे मद्याच्या दुकानांचे शटर डाऊन झाले, तरी या डाऊन शटरअाड मात्र खुलेअाम ‘पार्सल’ देण्याचा धंदा तेजीत अाहे. हे बाटलीबंद पार्सल खिशात घालून जाणारे मद्यशाैकीन घरी पार्सल नेता रस्त्यातच ते गटविण्याची साेय साधतात. त्यातूनच त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्यांचा अाधार मिळायला लागला. ‘दिव्य मराठी’ने देवपूरमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीवर हा प्रकार पाहिला. त्यातून स्टिंग केले. या टपरीवर एक व्यक्ती अगाेदरच ग्लासात अाेतलेली दारू रिचवत हाेती. मध्यमवयीन असलेल्या या व्यक्तीचे पिणे हाेत नाही, ताेच या टपरीवर अंधाराच्या अाडाेशाने सुटाबुटातील व्यक्ती येऊन उभी राहिली.

अापले जणू राेजचेच हे काम असावे, अशा पद्धतीने संबंधित व्यक्तीने अापल्या हालचाली सुरू केल्या. प्रारंभी वापरून फेकण्याचा ग्लास घेतला. त्यानंतर पाणीपाऊच घेतले. खिशातून मद्याची बाटली काढली. ती ग्लासात अाेतली. पाणी मिक्स केले अाणि एका दमात पहिला पेग रिकामा केला. त्यानंतर दुसरा पेगही बनवायला सुरुवात केली. देवपूरमधील भररस्त्यावर रात्री ते ८.३० वाजता हा प्रकार सुरू हाेता. या परिसरात भाजीबाजार अाहे. त्याचबराेबर काही अंडापावच्या हातगाड्याही लागतात. त्यामुळे गजबज असते. या गजबज वर्दळीचा फायदा मद्यशाैकीन घेताना दिसतात. गर्दीची मजा लुटत उघड्यावर हे मद्यप्राशन हाेते. ‘दिव्य मराठी’ने या उघड्यावरील मद्यप्राशनाचे स्टिंग केले. त्यातून संबंधितांना संशयही अाला. मात्र, तरीही दुर्लक्ष करीत अापला पिण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.
 
या पानटपऱ्यांवर पिण्याच्या पाण्याचे पाऊच मिळतात. तहान लागलेल्यांसाठी ते चांगले ठरतात. मात्र त्याचाही उपयाेग दुसऱ्याच कामासाठी हाेताना दिसताे. परिणामी टपऱ्यांवरील उघड्यावर मद्य प्राशनाचे प्रकार वाढले अाहे. पाेलिसांसह काेणतीही यंत्रणा याकडे ठाेसपणे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे टपऱ्या तसेच अंडाभुर्जीच्या गाड्यांवर मद्यशौकिनांची गर्दी होताना दिसते.
 
कारवाईच्या दिल्या सूचना...
पाेलिसांकडून शहरातील साेडा, अंडाभुर्जीच्या गाड्यांवर हाेणाऱ्या मद्यविक्रीबाबत अनेकदा कारवाई केली अाहे. कारवाई सातत्याने हाेत असते. मात्र, अनेकदा हातभट्टी किंवा गावठी दारू नागरिक खिशातून घेऊन संबंधित गाड्यावर येऊन प्राशन करतात. त्यामुळे सर्वच साेडा, अंडाभुर्जीच्या गाड्यांवर मद्यविक्री हाेते असे म्हणता येणार नाही. कारवाईबाबत संबंधित पाेलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या अाहेत.
- हिंमतजाधव, डीवायएसपी, शहर विभाग
 
‘पार्सल’ मिळतेच कसे?
मद्यशाैकीन टपऱ्यांवर जाऊन खिशातून बाटल्या काढतात. त्यानंतर मद्य पिण्याची प्रक्रियाही पूर्ण करतात. मात्र हे पार्सल मिळतेच तरी कसे, याकडे मात्र सरळ दुर्लक्ष हाेत अाहे. सध्या शहरात दारूची केवळ दाेन दुकाने अधिकृतपणे सुरू अाहेत. त्यांच्यावर माेठी गर्दी असते. या दुकानांमध्ये मद्यप्राशन करणे शक्य हाेत नाही. त्याचवेळी एवढ्या गर्दीत पार्सलही मिळत नाही. बंद दुकानांच्या अाड मात्र ही विक्री खुलेअाम हाेताना दिसते. म्हणूनच नागरिकांना पार्सल मिळते.
 
बातम्या आणखी आहेत...