आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध नळजोडण्यांमधून महापालिकेला मिळेल उत्पन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात पाणीपुरवठा करताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर अवैध नळजोडण्याही अधिक असल्याने अशा जोडण्या शोधण्याचे काम मनपा करणार आहे. त्यातून पाणी नियोजनातील अडचणी दूर केल्या जाणार आहेत.

शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी पूर्वीपासून नियोजनाप्रमाणे काम करण्यात येत आहे. शहरातील पाइपलाइनही 50 ते 60 वर्षांपूर्वीची आहे. शहरातील नागरिकांना महापालिकेतर्फे दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मध्यवर्ती शहरापासून लांब अंतरावर नवीन वसाहतींनाही पाइपलाइन टाकून पाणी देण्यात येत आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभांची संख्या अपूर्ण पडत आहे. आज शहराची लोकसंख्या साधारणपणे चार लाखांवर गेली आहे. त्यांना 13 जलकुंभांवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे एका जलकुंभावरून पाच किलोमीटरपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे लांब अंतरापर्यंत पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी जास्त वेळ पाणीपुरवठा करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरात अनेक ठिकाणी पाइपलाइनवर अवैधरीत्या नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. नुकतेच देवपूर भागात मालमत्ता तपासणी मोहिमेत 289 अवैध नळजोडण्या उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याकरिता अवैध नळजोडणी शोधमोहीम राबविणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात चाळीस हजारांवर वैध नळजोडण्यांची नोंद आहे. त्यातून साडेसहा कोटी रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात येते. मात्र, अद्यापही पाणीपट्टीची दोन कोटींपर्यंत थकबाकी आहे. शहराची लोकसंख्या पाहता निम्म्यावर लोकसंख्या ही इतर ठिकाणाहून पाणी घेत आहे. तर काही जण अवैध नळजोडणीद्वारे पाण्याचा उपयोग करीत आहेत. चाळीस हजार नळजोडण्यांमागे सरासरी पाच व्यक्तीप्रमाणे दोन ते अडीच लाख नागरिक पाणी घेत आहेत. तर पाणीपुरवठा विभागातर्फे वर्षभरापूर्वी सुरू असलेल्या सर्वेक्षणातून नळजोडण्यांची संख्या प्राप्त होणार आहे.