आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना सुदृढ बनवण्यासाठी सीताफळ खाऊ घाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिशिरऋतूला सुरुवात झाली असून बाजारात फळांची रेलचेल पाहायला मिळतेय. बाजारात खूप फळे दाखल झाली असल्याने फळांचा बाजार फुलांप्रमाणे सध्या फुलला आहे. त्यामध्ये थंडीच्या या ऋतूत पौष्टिक अशी गराने भरलेली सीताफळे मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस आली आहेत. सीताफळ लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. सीताफळासोबत चिकू, पेरू, केळी, सफरचंद मोसंबी अशा अनेक फळांची सध्या बाजारात रेलचेल पाहायला मिळत आहे.
हिवाळ्यात सगळ्यांनी भरपूर सकस आहार घ्यावा, असा डॉक्टरांचा आग्रह असतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीराला योग्य पोषण मिळत असते. या दिवसात फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. बाजारात सध्या सीताफळांच्या विविध जातींचा दर ५० ते १०० रुपये किलो आहे. मोठ्या आणि लहान गावराणी सीताफळांना जळगावकरांकडून सध्या चांगलीच मागणी वाढली आहे.

जिल्हाभरातून सीताफळे शहरात विक्रीस येत आहेत. त्यातही जामनेर तालुक्यातून सर्वाधिक माल शहरात विक्रीस येत असतो. काही आजारात रुग्णांना सीताफळे सहन होत नाही, त्यामुळे अशा रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच ती खावी, असे आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी सीताफळ अत्यंत उपयुक्त असते. हे फळ थंड असल्याने ज्यांना सर्दी, खाेकला, कफाचा त्रास आहे, अशांनी खाऊ नये. ज्यांचे शरीर उष्ण आहे, त्यांना मात्र ते अत्यंत उपयुक्त असते. डॉ.श्रेणिक भंसाळी, आयुर्वेदतज्ज्ञ.
हे करावे
* उष्ण शरीराच्या व्यक्तींनी सीताफळ खावे.
*शरीरात उष्णता असलेल्यांनी सीताफळाची साल, तळ हात पायांना लावावे.
*दोन जेवणांच्या मधल्या वेळात सीताफळ खाणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार.
*लहान मुलांना फळाचा गर मधासोबत दिल्यास तो अधिक फायदेशीर असतो.

हेकरू नये
* रिकाम्यापोटी सीताफळ खाऊ नये.
*सर्दी, खोकला, कफाचे विकार असणाऱ्यांनी खाऊ नये.
*दूध, आइस्क्रीमसोबत खाऊ नये.

कॅल्शियमचा भरपूर साठा
सीताफळातकॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे फळ मानले जाते. सीताफळाचा गर लहान मुलांना मधासोबत दिल्यास आरोग्य वाढीस लागते. तसेच स्तनपान करणाऱ्या आईने जर सीताफळ खाल्ले तर तिच्या दुधातून बाळाला पोषण मिळते. कफाचा त्रास असलेल्या मुलांना मात्र हे फळ देऊ नये, तसेच दोन जेवणाच्या मधल्या वेळातच शक्यतो हे फळ खावे. हिवाळा हा पित्ताचा काळ असतो, त्यामुळे या काळात सीताफळ खाल्ले तर ते पचायला सोपे ठरते.