आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधकांच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान, आमदार सावकारे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - बालवयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये उपजत कलागुण असतात. या कलागुणांना पैलू पाडण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. त्यामुळे भावी वैज्ञानिक आणि संशोधकांच्या जडणघडणीत शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो, असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले.

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शनिवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन झाले. विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी स्पर्धकांना आमदारांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. आजच्या युगात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकांवर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा. डिजिटल शाळा, ज्ञानरचनावादामुळे शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ हाेईल. त्यामुळे सुविधांचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकास साधावा, असे आवाहन सावकारे यांनी केले. उपसभापती मुरलीधर पाटील, सदस्या अलका पारधी, सोनू मांडे, सहायक गटविकास अधिकारी एस.डी. पाटील, सुमित्र अहिरे, रागिणी चव्हाण, मुख्याध्यापिका प्राची देसाई, मुख्याध्यापक प्रकाश चौधरी या वेळी उपस्थित होते.

जिल्हास्तरासाठीयांची झाली निवड- प्राथमिक गट : प्रथम-काजल मेटकर (बियाणी स्कूल), द्वितीय- सिद्धश पाटील (शारदा माध्यमिक विद्यालय, दीपनगर), तृतीय- विपुल झांबरे (महर्षी व्यास विद्यालय, विल्हाळे), माध्यमिकगट : प्रथम-मृण्मयी फाटक (अहिल्यादेवी विद्यालय), द्वितीय- केतन फिरके (सेंट अलाॅयसिस हायस्कूल), तृतीय- अभिजित पवार (म.गांधी विद्यालय, वरणगाव), उत्तेजनार्थ- लोकेश वैद्य (के.नारखेडे विद्यालय), प्राथमिकशिक्षकांचे साहित्य : प्रथम-नामदेव महाजन (मोंढाळे), द्वितीय- पौर्णिमा राणे (साकरी), तृतीय- मीरा जंगले (बोहर्डी), माध्यमिकशिक्षकांचे शैक्षणिक साहित्य : प्रथम-निर्मल सुराणा (अहिल्यादेवी विद्यालय), द्वितीय- व्ही.जे.पाटील (के.नारखेडे विद्यालय), लोकसंख्या शिक्षण गट : प्रथम- विजय झोपे (कदम विद्यामंदिर, वरणगाव), द्वितीय- अशोक तायडे (तळवेल), तृतीय- विनोद सोनवणे (के. नारखेडे).

२५ हजारांचे अनुदान देऊ
दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी शासकीय अनुदान मिळत नाही. याचा बोजा संबंधित संस्थेवर पडतो. त्यामुळे पुढील वर्षापासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पंचायत समितीच्या निधीतून २५ हजार रुपयांची तरतूद केली जाणार आहे, अशी घोषणा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चौधरी यांनी कार्यक्रमात केली.

शिक्षकांचा केला गौरव
भोपाळ येथे एनसीअारटीतर्फे आयोजित गणित कार्यशाळेसाठी राज्यातून महात्मा गांधी विद्यालयाचे (वरणगाव) शिक्षक एस.एन.मोरे यांची निवड झाली. तसेच आंध्र प्रदेशातील कुप्पम येथे विज्ञान शिक्षकांच्या कार्यशाळेत बी.बी.जोगी, एस.आर. झांबरे, प्रशांत वंजारी, तुषार बाविस्कर, रुद्रसेन गंठिया यांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे शिक्षकांचा गौरव झाला.

कुमठे बीटला भेट
‘राष्ट्रनिर्माणासाठी विज्ञान तंत्रज्ञान’ या विषयांतर्गत १६७ उपकरणे शैक्षणिक साधनांची मांडणी करण्यात आली. तसेच तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी टॅब्लेट स्कूलला चालना दिली जाणार आहे. जानेवारीपासून सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट येथे तालुक्यातील ५० शिक्षकांच्या भेटीचे आयोजन करण्यात अाले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी बोलताना दिली.
बातम्या आणखी आहेत...