आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Important Files May Got Damaged Due To Water Logging In Tahsil Office

तहसीलचे रेकॉर्डरूम झाले जलमय; दस्तऐवज भिजण्याची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील ब्रिटिशकालीन इमारतीत वसलेल्या तहसील कार्यालयास पावसामुळे गळती लागली आहे. रेकॉर्ड रूममध्ये सन 1885 पासून संग्रही असलेले दस्तऐवज पाण्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने थेट वीजपंप बसवून तहसील कार्यालयातील पाण्याचा उपसा केला. तहसील कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच असा प्रयोग राबवण्याची वेळ प्रशासनावर आली.

भुसावळ शहरात बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. या कारणाने शहरातील बहुतांश खोलगट भागात पावसाचे पाणी साचले. बलबलकाशी नाल्यास पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, तालुकाभरातील नागरिकांचे सतत कामे असलेल्या तहसील कार्यालयातही पावसाचे पाणी शिरले. तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटिशकालीन असून अत्यंत जीर्ण झाली आहे. इमारतीचा मुख्य भाग खोलगट असल्याने आवारातील सर्वच पाण्याचा निचरा न होता हे पाणी थेट इमारतीच्या व्हरांड्यात शिरते. इमारतीच्या आतील भागात रेकॉर्ड रूम असून त्यात सन 1885 पासूनचे दस्तऐवज, गावनोंदी, सातबारा उतारे, जन्ममृत्यू नोंदी, ड पत्रकाच्या नोंदी आणि मोडी लिपितील पुरातन नोंदी आहेत. पावसामुळे या भागातही पाणी साचले आहे. इमारतीचे कौलेही कालबाह्य झाली असल्याने त्यातूनही संततधार सुरू होती. भिंती आणि कौले पावसामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या स्थितीतही तहसीलदार वैशाली हिंगे व कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत.

काम रखडले
तहसील कार्यालयासाठी सध्याच्या गोदामाच्या जागेवर नूतन इमारत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ते अत्यंत संथगतीने होत असल्याने तहसील कार्यालयाचे स्थलांतर होण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत. पावसाळ्यात तहसीलचे काम कालबाह्य झालेल्या ब्रिटिशकालीन इमारतीत होत असल्याने पावसाचे पाणी शिरण्याचे प्रकार वाढत आहेत