आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनरक्षक औषधे 30 टक्के स्वस्त होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह यांसह अनेक गंभीर आजारांवरील जीवनरक्षक औषधांच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार आहेत. सरकारने ‘ड्रग्ज प्राईज कंट्रोल ऑर्डर’अंतर्गत आणलेल्या 345 पैकी पहिल्या 154 मॉलिक्यूल्सची (औषधी घटकद्रव्यांची) यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात किमती घटवल्याने रुग्णांना स्वस्त औषधे उपलब्ध होणार आहेत. मात्र, ती कमी किमतीत मिळण्यासाठी 1 ऑगस्ट 2013 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

रुग्णांना स्वस्त दरात औषधोपचार उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने ‘ड्रग्ज प्राईज कंट्रोल ऑर्डर अंडर नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसीन 2013’ची घोषणा केली. त्यात 345 औषधांच्या मॉलिक्यूलचा समावेश होता. त्यानुसार, मंगळवारी पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात पॅरासिटॅमॉलसारख्या 154 औषधी घटकद्रव्यांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. घटकद्रव्यांच्या किमतीच कमी केल्याने औषधांच्या किमतीही 25 ते 30 टक्क्यांनी कमी होणार आहेत. विशेष म्हणजे क्रोसिन, कॉम्बिफ्लेम, अँजिथ्रो मायसीन, डायक्लोपॅरा टॅब्लेट यांसारख्या दैनंदिन वापरातील औषधांच्या किमतीही घटणार आहेत. दरम्यान, उत्पादक, विक्रेते आणि वितरकांना सध्याच्या किमतीत औषधे विक्री करण्यासाठी 46 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 1 ऑगस्टपासून मात्र त्यांना नव्या किमतीतच औषधांची विक्री करणे बंधनकारक असणार आहे.