आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद भागात आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये कृत्रिम पाऊस; टेंडर दिले, \'रडार\' सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताक्रांत आहे. थोड्या पावसात अनेकांनी पेरण्या केल्या आहेत. यामुळे काही दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या २५० कि.मी. परिघात येत्या आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल, अशी माहिती महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी दिली.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीनंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाविषयी यापूर्वीही त्यांनी सांगितले होते. परंतु याबाबत आणखी विचारणा केली असता कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी करणे व नियोजनास वेळ लागणार असल्याने येत्या महिनाभरात किंवा दोन महिन्यांत हा प्रयोग यशस्वी केला जाईल, असे खडसे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

टेंडर दिले, रडारसह यंत्रणा सज्ज
कृत्रिम पावसासाठी टेंडरही देण्यात आले असून, यंत्रणा सज्ज आहे. रडारसह प्राथमिक यंत्रणा तयार असून, हवामान खात्याकडून माहितीही मागवण्यात आली आहे. राॅकेट लाँचिंगच्या यंत्रणेद्वारे हा प्रयोग राबवला जाणार आहे. २५० कि.मी. परिघात त्याचा सकारात्मक परिणाम येईल, असे खडसे म्ह्णाले.

प्रेझेंटेशनही झाले : शर्करायुक्त राॅकेट तंत्राने पाऊस पाडण्याचा दावा करणा-या तज्ज्ञांशी सरकारने संपर्क केला. आयएसपीएस संस्थेचे विश्वस्त अब्दुल रहेमान वेनू यांनी खडसे यांच्यापुढे गेल्या महिन्यात प्रझेंटेशनही केले. ४५ कि.मी. उंचावर ढगांपर्यंत जाऊन हे राॅकेट काम करते, असे वेनू म्हणाले.

राज्यात पहिला प्रयोग बारामती, शेगावात राज्यात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग २००३-०४ मध्ये बारामती व शेगाव या दाेन ठिकाणी २०० कि.मी. परिघात झाला. प्रत्यक्षात फक्त १ ते ६ मि.मी. पाऊस पडला होता.

५० कोटींपर्यंत खर्च : बारामती, शेगावातील पहिल्या प्रयोगाचा खर्च १२ कोटी आला होता. आता हा खर्च ५० कोटींच्या घरात गेला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बियाण्यात सबसिडी देणार दुबारपेरणीची वेळ पाहता पुरेसे बियाणे उपलब्ध करून देतानाच बियाण्यांवर सबसिडी किंवा कमी दराने बियाणी उपलब्ध करून देण्यात येईल.