आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ तालुक्यात केवळ 200 हेक्टर जिरायती; पेरणी बळीराजाच्या नजरा भिडल्या आकाशाकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र यंदा उन्हाचा तडाखा अधिक असल्याने जमिनीत दोन इंचही ओलावा निर्माण झालेला नाही. यामुळे तालुक्यात केवळ २०० हेक्टर जिरायती क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर ३५०० हेक्टर बागायती क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. येत्या पंधरवाड्यात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. 
 
भुसावळ तालुक्यातील दक्षिण भागातील सुनसगाव, कुऱ्हे पानाचे, खंडाळा, मोंढाळा, शिंदी, सुरवाडे थेट बोहर्डीपर्यंतच्या भागात अल्प पाऊस झाला. यामुळे जमिनीत केवळ दोन इंचापर्यंत देखील पाणी मुरले नाही. तालुक्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बागायती क्षेत्रावर कापूस लागवडीला सुरूवात झाली. भुसावळ तालुक्यातील तब्बल ३५०० हेक्टरवर बागायती कापूस लागवड झाली असून या पिकांची स्थिती सध्या उत्तम आहे. तालुक्यातील पिंप्रीसेकम, तळवेल, वरणगाव, हटाकळी, हतनूर, कठोरा आदी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने या भागात जिरायती २०० ते ३०० हेक्टर ज्वारी, मूग, उडीद, मका आदी पिकांची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. पेरणी क्षेत्राबाबत सोमवारपर्यंत (दि.१९) वाढ होणार असल्याचा अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यंदा मान्सून वेळेवर असल्याने जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरही जमिनीत ओलावा कायम राहत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठ फिरवली आहे. 
 
२६ हजार हेक्टर क्षेत्र : भुसावळ तालुक्यात यंदा २६ हजार २३० हेक्टरवर पेरणी होईल, असा पेरणीपूर्व अंदाज तालुका कृषी विभागाने वर्तवला होता. गतवर्षापेक्षा यंदा ज्वारीत घट होऊन मका, सोयाबीनचे क्षेत्र ७०० हेक्टरपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पेरणी वेळेवर झाल्यास कृषीचा हा अंदाज खरा ठरेल.
 
सर्वाधिक १५ हजार हेक्टरवर कापूस लागवड 
भुसावळ तालुक्यात गतवर्षांप्रमाणे यंदा कापसाची सर्वाधिक लागवड आहे. २६ हजार २०० हेक्टरपैकी १५ हजार २०० ते ३०० हेक्टरवर कापूस आणि अन्य क्षेत्रावर सोयाबीन, ज्वारी, मका, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे. १५ हजार ३०० हेक्टरपैकी सरासरी हजार हेक्टर क्षेत्र बागायत कापूस क्षेत्रात समाविष्ट होते. 
 
पावसाची प्रतीक्षा 
पाऊस झाला मात्र तो अद्यापही पेरणीयोग्य नाही. यामुळे तालुक्यातील केवळ तापीकाठावरील पिंप्रीसेकम, हतनूर, तळवेल, कठोरा आदी परिसरात कमी प्रमाणात पेरणी झाल्या. दमदार पावसानंतरच पेरण्यांना गती येणार आहे. दमदार पावसाची अद्यापही शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पी.डी. देवरे, तालुका कृषी अधिकारी, भुसावळ 
 
बातम्या आणखी आहेत...