आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात तिघांना पिस्तूलसह पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गुन्हेगारीने डोके वर काढलेल्या भुसावळ शहरात मंगळवारी सकाळी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेने जिवंत काडतुसासह एक गावठी कट्टा आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक संशयित पसार होण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे या चौघांपैकी दोघांवर गावठी पिस्तूलप्रकरणी बाजारपेठ पोलिसांकडून जुलैमध्येच कारवाई केली होती. भुसावळात जिवंत काडतुसासह गावठी कट्ट्याची विक्री होत असल्याचा सुगावा एलसीबीला दोन दिवसांपूर्वीच लागला होता. यानुसार त्यांनी संशयितांवर पाळत ठेवली होती. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एलसीबीच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, उपनिरीक्षक जिजा गुट्टे, सहायक फौजदार मुरलीधर आमोदकर, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, युनुस शेख, सुरेश महाजन, संजय सपकाळे, दीपक पाटील, बबन तडवी आदींच्या पथकाने भुसावळ शहरातील मच्छी मार्केट भागात सापळा लावला.

त्यात तिलक देविदास मटरू (वय २३), सचिन भीमराव वाघ (वय २३, दोन्ही रा. मच्छी मार्केट, भुसावळ) आणि अनिकेत संजय नागपुरे (वय २१, रा. शिवाजीनगर, भुसावळ) या तिघांना २० हजार ५०० रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. मात्र, शेख उमर शेख उस्मान हा पसार होण्यात यशस्वी झाला. या सर्व आरोपींविरुद्ध हवालदार रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, एलसीबीचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी कारवाईसाठी पथकाला मार्गदर्शन केले होते.

दोघांवर तीन महिन्यांत दुसरा गुन्हा दाखल
यापूर्वी जुलै २०१६ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिवपूर-कन्हाळा रोडवर तीन युवकांकडून तीन गावठी पिस्तुलांसह तीन जिवंत काडतूस ताब्यात घेतले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांमध्ये शेख उमर शेख उस्मान, अनिकेत नागपुरे (दोन्ही, रा.शिवाजीनगर, भुसावळ) यांचाही समावेश होता. आता पुन्हा तीन महिन्यांनी या दोघांवर गावठी पिस्तूलप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

म्हाेरक्या कोण?
गावठीपिस्तूल, जिवंत काडतुसासह पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींचे वय २३ वर्षांपेक्षा कमी आहे. यामुळे त्यांचा म्हाेेरक्या कोणी वेगळाच आहे का? तसेच एलसीबीच्या पथकाने भुसावळात येऊन केलेली कारवाई पाहता स्थानिक पोलिसांनी मरगळ झटकणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...