आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांची पाण्याची कटकट संपली!, टंचाईच्या काळातील चिंता मिटली..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाघूर धरणातील पाण्याची स्थिती पाहता 'अपस्कीम'चे पाणी 20 मेपर्यंत पुरणार असल्याच्या अटीतटीची वेळ येण्यापूर्वीच 'डाऊन स्कीम' कार्यान्वित करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या यंत्रणेकडून 75 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून योजनेतून पाणी उचल करणे शक्य झाले आहे. पाऊस लांबला तरी आहे, त्या साठय़ातून जळगावकरांना पुढील सहा महिने पाणीपुरवठा करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

महापालिकेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या योजनेसाठी रात्रंदिवस एक केलेल्या जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर अर्धातास आधीच प्रकल्पस्थळी पोहचले होते. पंपांच्या कंट्रोल पॅलेटचे बटण दाबून जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला. या वेळी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती नितीन बरडे, पाणीपुरवठा विभागप्रमुख अ.वा.जाधव, शहर अभियंता डी.एस.खडके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. एस.जैन, एस.सी.चौधरी, सहायक अभियंता एस.एल.पाटील, उप अभियंता प्रदीप लोहार, शाखा अभियंता सुधीर महाजन, आर. सी. नवलखे उपस्थित होते.

75 दिवसांत योजना पूर्ण- राज्य शासन व पालिकेच्या 2 कोटी 1 लाख रुपये खर्चातून पूर्ण झालेल्या योजनेच्या कामाला 25 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. नाशिक येथील आडके कन्स्ट्रक्शनने हाती घेतलेल्या कामावर देखरेख करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे होते. मात्र जळगावकरांसाठी हे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे असल्याने महापौर किशोर पाटील, स्थायी सभापती रमेश जैन, गटनेता नितीन लढ्ढा यांयासह पालिकेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांनी पर्शिम घेत 75 दिवसात योजना तडीस नेली.

तासाला 28 लाख लिटर उचल- धरण बेसिनमध्ये पाणी सोडण्यात आल्यावर तेथून चार पंपांच्या मदतीने हे पाणी उचलून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीत टाकले जाणार आहे. प्रति तास 28 लाख लिटर पाणी उचलण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. 24 तासात 30 ते 35 दशलक्ष घन मीटर (एमएलडी) पाणी उचल करणे शक्य होणार आहे. पालिकेच्य 'अपस्कीम'च्या पाइपाच्यावर 30 सेंटी मीटर पाण्याची पातळी आहे, त्यातून 20 मे पर्यंत पाणी मिळणार आहे. त्यानंतर 'डाउन स्कीम' ची आवश्यकता भासणार आहे.

180 दिवस पुरेल पाणी- धरणावर कार्यान्वित करण्यात आलेल्या 'डाउन स्कीम'च्या माध्यमातून 20 मे नंतर पाणी उचल सुरू होणार आहे. पाणी उचल सुरू झाल्यावर पुढील 180 दिवस पाणी पुरवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. स्लज व्हॉलमधून पाणी सोडणे शक्य असेपर्यंत योजना कार्यान्वित राहू शकणार आहे.

अधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य- अडीच महिन्यापासून योजनेसाठी प्रयत्नशील असणारे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, सभापती नितीन बरडे, विभागप्रमुख अ.वा. जाधव यांच्यासह अभियंत्यांच्या चेहर्‍यावर यशस्वी चाचणीनंतर हास्य फुलले.